नात्यांचा गोफ विणतांना

relationships - Maharashtra Today

नुकतेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते गौर गोपाल दास यांच्या “जीवन समजून घेताना “या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात त्यांनी जीवनाचे मर्म समजण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते असे म्हंटले, हे सांगताना ते म्हणाले की, त्यासाठी तुमच्याकडे तीन फॅक्टरीज असणे गरजेचे आहे.

1) जिभेवर शुगर फॅक्टरी.2) डोक्यात आईस फॅक्टरी 3) हृदयामध्ये लव फॅक्टरी. तीन माध्यमातून जीवन समाधानी बनेल.

फ्रेंड्स ! आपण सध्या बघत असलेल्या सकारात्मक मानसशास्त्राचाही एक महत्त्वाचा पैलू हा नातेसंबंधांची जपणूक हा आहे. त्या संदर्भात वरती सांगितलेल्या जीवनाच्या आवश्यक फॅक्टरी मला खूप महत्त्वाच्या वाटल्या. थंडीत आपण गरम कपडे घालून आपले रक्षण करतो. त्यावेळी थंडीला दोष न देता स्वतःला थंड हवामानाशी जुळवून घेतो. उलट थंडी येणार म्हणून आपण स्वेटर, टोप्या, शाली धूऊन ठेवतो आणि थंडीचे स्वागतही करतो. त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाशी जुळवून घेता येण्यासाठी मानसिकतेची कौशल्य जोपासावी लागतात.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मी सहज प्रश्न केला की दुसऱ्या व्यक्तीचा बिनशर्त स्वीकार करण्यापासून आपल्याला कोणती गोष्ट रोखते ? आणि खूप वेगवेगळी उत्तरं समोर आली. अहंकार, दृष्टिकोन, इगो ,अटीट्युड, असुरक्षितता, अपेक्षा, निस्वार्थी प्रेमाच्या भावनेचा अभाव, हट्टीपणा , समोरच्या कडून कसा रिस्पॉन्स मिळेल ही भीती, नेहमी मीच का हात पुढे करायचा हा विचार ,इत्यादी अनेक !

खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अवगुणांचे, कमतरतानचे सतत चिंतन करत वा सांगत राहिल्याने आपण आपल्याच मनात भीती ,काळजी ,राग ,चीड ,द्वेष अशा भावना निर्माण करतो. आपली मानसिक शक्ती अजाणतेपणी कमी करत असतो. नकारात्मक त्यामुळे आपले आणि आपल्या सहवासातील इतर व्यक्तींचेही नुकसान करतो .म्हणून आपल्या हिताचा विचार करून आपले पूर्ण लक्ष हे स्वतःचे विचार आणि भावनांवर केंद्रित करावे की ज्यामुळे इतरांचाही फायदा होईल.

नातेसंबंध आणि ते जोपासणे हे तसं बघितलं तर खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आज तर ही फार महत्त्वाची गोष्ट ठरते आहे .कुटुंब लहान होत जाताना, यानंतर वैयक्तिक संबंधांना आवश्यक अशी कौशल्य कमी होतात आहे त्याचा परिणाम फक्त वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबतीतच होतो असे नाही तर व्यावसायिक बाबतीतही होतो .शेवटी माणसाला लोकांची गरज असते . तेथे वावरतांना विविध असणाऱ्या लोकांशी जुळवून घेता येण्याची गरज पडते. कारण जुळवून घेण्याची इच्छा असणे आणि जुळवून घेता येणे यात फरक असतो. ते एक skill किंवा कौशल्य आहे.

जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनेक नातेसंबंधांत बरोबर आपला संवाद होत असतो. यासाठी संस्कार कौशल्य हे जसे आवश्यक आहे तसेच या नातेसंबंधांवर परिणाम करणाऱ्या इतरही काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे आजचे तंत्रज्ञान, माध्यमे, व्यक्ती किंवा घटनांना असणारे महत्त्व, प्राधान्यक्रम, स्वतःची ध्येय आणि आत्मभान, तुलना करण्याची मानसिकता, बदलती जीवन मूल्ये, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आत्मकेंद्री वृत्ती. विश्वासाची घट्ट वीण इ. प्रत्येकाने एक प्रश्न स्वतःला विचारायचं या व्यक्तीचे माझ्या आयुष्यातील स्थान आणि माझ्या आयुष्यातील महत्त्व किती ?

जोडीदारा बरोबरच्या नात्यांमध्ये दोघांमध्ये तिसरा येणे हा एक प्रश्न असतो, त्यावेळी जोडीदाराबरोबरचे नाते स्वेच्छेने की लादलेले? किंवा बरेचदा वैवाहिक आयुष्य समाजातील स्थान स्थिरस्थावर झालेल्या व्यक्तींना ,आता आयुष्य काहीतरी नवीन अशी गरज वाटते. मग उथळ नाती तयार होतात, तशीच ती पुसलीही जातात. बरेचदा जोडीदाराशिवाय, अनेक नात्यांचा संबंध काही मानसिक विकृतीशी पण असतो. या सार्‍या नाजूक नात्यांकडे कसे बघतो ही ,प्रत्येकाची जडणघडण ,व्यक्ती म्हणून मिळालेले वैचारिक स्वातंत्र्य ,विशिष्ट विचारांचा पगडा यावर अवलंबून असते. फक्त प्रत्येक नातं हे वासने भोवती घुटमळणारे नसतं हे लक्षात घेतलं तरी पुरेसं होतं.

कुठल्याही नात्यांमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे weaver आणि दुसरा म्हणजे taker !

यापैकी आपली नेमकी भूमिका कोणती ? याचा विचार करता येतो. weaver म्हणजे दुसऱ्याची काळजी घेणे, निर्णय घेणे, आश्रयदाता, आणि taker म्हणजे प्रत्येक गोष्ट घेणारा, मदत सुरक्षितता संगोपन, किंवा आश्रयाने राहणारा. यामध्ये आपली गरज परस्परांनी बोलून दाखवायला पाहिजे, अपेक्षा आहे की मग कशाची गरज आहे हे कळलं की व्यवहार सोपा होत जातो.

संयम, विश्वास, प्रेम ,आपुलकी, समजून घेणं आणि स्वीकार हे प्रत्येक नात्यांमध्ये खूप आवश्यक असतं. उदाहरणार्थ कुठेतरी जाण्याचा दोघांनी पती-पत्नींनी प्लॅन केला. परंतु अतिशय वेळेवर महत्वाची मिटींग निघाली आणि नवीन जॉब असल्यामुळे त्याला येणे शक्य नाही, म्हणून तुम्हाला फोन आला. अशावेळी आपली म्हणजे पत्नीची प्रतिक्रिया काय असेल किंवा असायला हवी? एक प्रतिक्रिया अशी असू शकते की राग राग करणे, रुसून बसणे, तुला माझी किंमत नाही किंवा तुझे माझ्यावर प्रेम नाही अशी समजूत करून घेणे वगैरे. आणि दुसरा भाग असा असू शकेल की ठीक आहे ! नवीन जॉब असल्यामुळे मीटिंग सोडून येणे शक्य नाही. मला जेव्हा काम असतं तेव्हाच मी पण हाच निर्णय घेते. आज नाही जाता आलं तर पुन्हा कधी जाऊ, आणि आज बाहेरून काही तरी मागवून तो आल्यावर त्याच्याबरोबर छान जेवण करू. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी करायचं का नाही हा माझा चॉईस आहे, वा असावा. इतर लोक जे वागतात ते त्याचं त्यांच्या परिस्थितीप्रमाणे किंवा हा विचार पद्धतीप्रमाणे वागत असतात. माझी प्रतिक्रिया माझी असते.

शेजार्‍यांशी असलेले नाते. ही पण एक चांगली नात्यांची गुंफण असते. ती अचानक जुळून आलेली ,पण कायमस्वरूपी मनात घर करून राहिलेली असते. आणि त्यातून जर आपल्याला लहानपणापासून एकच शेजार लाभलं तर विशेषच ! पुन्हा हे शेजार आजच्या फ्लॅट संस्कृती व्यतिरिक्त म्हणजे वाडा, चाळ असे असेल तर मग विचारायलाच नको. मला माझं लहानपण आठवतं. आम्ही वाड्यामध्ये दिवसभर भरपूर खेळत असू. हरतालिकेची पूजा जागरण एकत्र होई. पापड लाटणे, महालक्ष्मीची तयारी हे सगळे एकत्र होई. माझे दादा आणि ताई माझ्यापेक्षा बरेच मोठे ! मी शेंडेफळ. मग शेजारी मला माझ्या एवढ्या मैत्रिणी असल्याने मी जवळजवळ तिथेच वाहिलेली असे. आता मोठं झाल्यावर कळते कि त्या काकू शाळेत शिक्षिका होत्या. घरात आजी पणजी होत्या. सकाळी सकाळी लवकर उठून काकू ताक करायच्या. दहा वाजण्यापूर्वी त्यांचा स्वयंपाक व्हायचा, त्यांची कपडे भिजवणे, तांब्या पेले कपबश्या घासणे, तात्यांची पूजा करणे मुलींच्या यशासाठी प्रयत्न करणे हे बघतच मी मोठी झाले. नातेसंबंध कसे जपावे यासाठी माझ्यासमोरचा आदर्श नमुना म्हणून मी त्या काकूंकडे अजूनही बघते.

या सगळ्या नात्यांमध्ये स्वतःचा स्वतःशी असलेलं नातं हे सगळ्यात महत्त्वाचं. बरेचदा आपली बीलिफ सिस्टीम तयार होते. आणि तिच्यातून आपले काही विचार घडतात. बरेचसे बदलण्याची गरज पडते. संस्कार ,आलेले अनुभव यातून ती घडत असते. अशाच माझ्याकडे येणाऱ्या एका मुलाला तो काळा आहे ,असा समज झालेला होता .त्यातून त्याला न्यूनगंड आला होता. लग्न ठरवताना ती मुलगी आपल्याला असंच judge करेल, या भावनेने तो जात असे, आपोआपच त्याचा आत्मविश्वास खालावलेला असायचा. त्यामुळे ज्या काही एक दोन मुलींनी त्याला reject केलं त्याचं कारण त्याला नेमकं तेच वाटलं. आणि मग लग्न न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

फ्रेंड्स, अशावेळी आपली बिलीप सिस्टीम किती बरोबर आहे ? आपल्याला वाटतंय ते खरंच आहे का ? आणि हे कोण ठरवणार ? हे प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे. माझी चांगली बाजू कुठली ? मी ऑफिसमध्ये एकदम चांगला काम करणारा आहे. प्रमोशन्स पण भरभरून होतात आहे. पगार चांगला आहे, स्वभाव निश्चितपणे चांगला आहे. असा जर स्वतःचा स्वतःशी विचार केला ही belief system बदलण्याची ची गरज भासते. रोजच्या जगण्यात स्वतःलाच सांगितलं पाहिजे,”माझे माझ्यावर प्रेम आहे, मी खूप छान आहे!” अस हे स्वतःच स्वतःची नातं सुदृढ असेल आजूबाजूचं जग सुदृढ करणं मला सहज शक्य होईल.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button