विदर्भ बुडत असताना उद्धवसरकार आरती करीत होते

badgeविदर्भात धरणांची कमी नाही. गोसेखुर्द, बावनथडी, पुजारी टोला, कालीसरार… या सारखे मोठे प्रकल्प आहेत. शेजारच्या राज्यात मध्य प्रदेशमध्ये संजय सरोवर धरण आहे. पाऊस वाढला आणि धरणांचे पाणी सोडण्याचे वेळेचे नियोजन कमी पडले तर ही धरणे-नद्या जीवघेण्या होतात. यावेळी हीच बेफिकिरी नडली. या आधी १९९४ आणि २००५ साली विदर्भाने महापुराचे तांडव अनुभवले. मात्र यंदाचे महापुराचे तांडव भीषण होते. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा. चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या चार जिल्ह्यांना तडाखा बसला. सुमारे दोनशे खेड्यातील ५३ हजार गावांना पुराचा तडाखा बसला असा प्राथमिक अंदाज आहे. माणसे मेली नाहीत. सुमारे ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. माणसे वाचली. पण जगायचे कसे? उरली आहे ती पाण्यात बुडालेली शेतीपिके आणि जमीनदोस्त झालेली घरे, रस्त्यावर आलेली बायामाणसे. करोनाशी दोन हात करणारे गावकरी ह्या पुराने जगण्याची उमेदच हरवून बसले आहेत. हे नुकसान टाळता आले नसते. पण त्याची तीव्रता नक्कीच कमी करता आली असती. गेल्या आठवड्यात विदर्भात तीन दिवस सारखा पाऊस पडत होता. शनिवारी सकाळपासूनच नद्या फुगत चालल्या होत्या. तासातासाची आकडेवारी सरकारी यंत्रणा गोळा करत होती. समोर जलप्रलय दिसत असताना महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने वागले नाही. रोम जळत असताना तिथला राजा निरो फिडल वाजवत बसला होता. आपल्याकडे मुख्यमंत्री उद्धव गणपतीच्या आरत्या करीत बसले असावेत. मुंबईचा पाऊस तो पाऊस. विदर्भातला पाऊस म्हणजे सरकार शिंतोडे समजते. विदर्भाकडे पाहण्याचा उद्धव सरकारचा सापत्नभाव या निमित्ताने स्पष्ट दिसून आला. पूर ओसरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भाकडे फिरकले नाहीत. विदर्भ महाराष्ट्रात नाही काय? त्यांचे मंत्री गावात फिरून मदतीची आश्वासने देत आहेत. पंचनामे होतील, नुकसानभरपाई भरपाई म्हणून काही पैसेही मिळतील. पण उध्वस्त झालेल्या स्वप्नांचे काय?

शेजारच्या मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आल्याने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. रविवारी तर निम्मे भंडारा शहर पाण्याखाली होते. प्रशासनाने गोसेखुर्द धरण प्रकल्पाची दारे वेळीच उघडून दिली असती तर भंडारा आणि परिसरातील ५८ गावे वाचली असती. भंडाराच नव्हे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यालाही गोसेखुर्द्चे सर्व एकूण ३३ दरवाजे उशिरा उघडल्याचा फटका बसला. रात्रीच पाण्याचे लोंढे गावात घुसू लागल्याने एकच घबराट उडाली. वैनगंगा व कन्हान नदीच्या संगमावर वसलेल्या पिपरी ह्या गावच्या गावकऱ्यांनी पूर्ण रात्र जागून काढली. ‘पाणी सुटणार असल्याने सतर्क राहायला प्रशासनाने सांगितले होते. पण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी येणार याची कोणीही कल्पना दिली नाही. त्यामुळे आम्ही गावातच राहिलो’ असे पिप्रीचे गावकरी सांगतात. पवनी तालुक्यातल्या ठाणा कोरांभीचे गावकरी तर जीवाच्या आकांताने हाती लागेल ते सामान घेऊन उमरेड अभयारण्याच्या रस्त्यावर आले. दोन दिवस हे गावकरी तिथे होते. आता बोला. अशीच कथा इतर गावचे गावकरी बोलून दाखवत आहेत. निर्बुद्ध सरकार आणि गाफील प्रशासन असल्याची जबर किंमत विदर्भ मोजतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज गावाला तर बेटाचे स्वरूप आले होते. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या पथकांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. नागपूर जिल्ह्यातल्या ४८ गावात पुराचे थैमान होते. काही वर्षापूर्वी मोवाडच्या पुराने अनेकांचा जीव गेला. ती काळरात्र यावेळी आठवली. कन्हान नदीला पूर आल्याने २६ हजार लोकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले. आज पाणी ओसरले आहे. पण आयुष्य कुठून सुरु करावे या चिंतेत गावकरी आहेत.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER