
प्रत्येकच घटना किंवा प्रसंग आपल्याला बरंच काही शिकवून जातो. काही चांगले, काही वाईट ! पण मुळातच आपण नेहमी सकारात्मकतेने बघायचे ठरवलेले आहे .असे असताना जेव्हा या कोरोना (Corona) कडे आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांनी आपल्याला खूप धडे, जगण्याचे नवे नियम, नवीन दृष्टिकोन शिकवले. २०२० चे आगमन झाले आणि साऱ्या जगावर कोरोणा नामक एका राक्षसाने अतिक्रमण केले. मला आठवतंय त्यावेळेस शाळा आणि हॉस्पिटल सर्वत्र याचीच चर्चा सुरू होती. तरी हे त्या तिकडे आहे चीनमध्ये, असे म्हणत मी एकीकडे ऐकत काम सुरू ठेवले होते असं आठवतय मला. आणि दिवसेंदिवस मग त्याचे स्वरूप बदलत गेले 13/ 14 मार्चला बारावीच्या परीक्षा संपल्या आणि हळूहळू कोरोना भारतात मूळ रुजऊ लागला. आपले खरे स्वरूप दाखवू लागला. भितीची लाट पसरली. आणि पहिले लॉक डाऊन लागले. मग काहींची मुले आणि आप्त जवळ तर काहींचे दूर. ज्यांची मुले आणि इतर नातेवाईक दूर होते त्यांच्या मनावर चिंतेचे सावट पसरलं. दुसरे ,तिसरे लॉक डाऊन आले ,लोक घरात कंटाळायला लागले. वेक्सीनच्या टेस्ट, संशोधन होत होते. लोक त्याची वाट बघत होते. आणि आता अखेर ती आली. आपला नऊ महिने काळ लोटल्यानंतर आपले ठप्प आयुष्य हळूहळू परत पूर्वपदावर येऊ लागले. पण कोणत्याही गोष्टीचे साईड इफेक्ट असतातच. त्याप्रमाणे हा कोरोना राक्षसाचे ही साईड इफेक्ट भरपूर आहेत. विविध गोष्टींवर ते वेगवेगळ्या प्रकारचे झाले. निरनिराळ्या व्यवसायांवर त्यांचे निरनिराळे परिणाम दिसले.
मुख्य म्हणजे टाळेबंदी मुळे येणे जाणे बंद झाल्याने आपापसातले नातेसंबंध बऱ्याच ठिकाणी ताणले गेले अनेक तक्रारी समोर आल्या . खरं तर वकिलांच्या कामाची एक पद्धत असते. पण घर व कार्यालय वेगवेगळ्या असणाऱ्यांची कामे ठप्प झाली किंवा फोन व्हिडिओ कॉल्स या माध्यमांच्या मार्फत जेवढे पक्षकार येऊ शकतील तेवढेच काम झाले. मुख्य म्हणजे वकिलांनी इतर नोकरी व्यवसाय न करण्याबाबत च्या नियमामुळे अनेक जण. पण यातली चांगली बाजूही आहे. दररोज त्रासदायक ठरणारे व्हाट्सअप ग्रुपआणि त्या माध्यमातून असलेला स्नेह, मैत्री, बांधिलकी कामी आली. ते सहकारी परस्परांस मदतीला आले. त्यात गरजू वकिलांना अन्नधान्यांची kits’ उपलब्ध करून देणे दैनंदिन कामकाजाची माहिती पुरवणे ,कोरोणा ग्रस्त वकील बहिणीच्या मुलीला मदत पोहोचवणे आणि वेबिनार झूम मीटिंग च्या मदतीने माहितीपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. ज्यांच्या माध्यमातून कायद्याच्या संपर्कात राहणे आणि अभ्यास होत राहणे चालू राहिले. हे आलेले संकट हे प्रत्येकाच्या सृजनशील तेला आव्हान ठरले.
समुपदेशनाच्या वेगवेगळ्या हेल्पलाइन्स सुरू केल्या गेल्या. ज्यातून गरजूंना घर बसल्या समुपदेशन केले गेले. शाळेच्या रिक्षा चालवणाऱ्या काकांच्या रिक्षा, शाळेच्या बसेस बंद झाल्याने, एकूणच जाणे थांबल्याने वाहन चालकाचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला.
बऱ्याच शाळांमधून ऑनलाइन वर्ग सुरु केले गेले. त्याचा फायदा तोटा फार पाहता येणे शक्यही नव्हते. तरीही ही काही शाळांमधून खूप वेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले गेले. रति भोसेकर या शिक्षणप्रेमी शिक्षकेने योजलेला उपक्रम म्हणजे” काको .”त्यांना मुलांशी घट्ट नातं जोडून थांबलेला संवाद सुरू करायचा होता. सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभागाच्या माहिती पुस्तिकेचा आणि आणि त्यातील काको उपक्रमाचा आरंभ झाला. 15 जूनला ही माहिती पुस्तिका पालकांपर्यंत पोहोचवली गेली. का को म्हणजे प्रत्येक घरात मुलांसाठी एक कामाचा कोपरा करण्याचं ठरलं. त्यात पालक वर्ग ताईंनी दिलेली काम ठेवतात आणि तो कोपरा सजवला जातो मुलांच्या मूड्स नुसार शैक्षणिक खेळ करायला सांगितलेली कामे ,अक्षर, अंक ,लहान-मोठे कमी-जास्त अशा वस्तू चिकट काम ,कागद काम, मातीकाम ,कातर काम ,छोट बालवाचनालय त्यामाध्यमातून शब्दचक्र ,अक्षर चक्र आणि मुलांच्या आवडीच्या शब्दांची “शब्द पेटी “असा असा खूप मोठा खजिना या काकू मध्ये आहे. त्याशिवाय मुलांसाठी रोज” एक गोष्ट स्वतः “रेकॉर्ड करून शाळेची ताई सांगते.
सिने-नाट्य क्षेत्रही ही याला अपवाद नाही. नाटक म्हटलं की फक्त रंगमंचावर वावरणारे कलाकार, किंवा प्रत्यक्ष सिनेमातले कलाकार एवढ्यापुरतेच मर्यादित नसते तर पडद्यामागे काम करणारे असंख्य लोक यात समाविष्ट असतात. सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक लोक या क्षेत्रांमध्ये नव्याने ही पदार्पण करत आहेत. पण अर्थातच या सगळ्यांसाठीच काहीतरी वेगळेच धोकादायक आणि दाहक असं समोर घेऊन आलं. सुरुवातीला नेहमीप्रमाणे हा अल्पविराम असेल असं सगळ्यांना वाटायचं. पण हळूहळू त्याच्यातील दाहकता सगळ्यांनाच कळली. जरी प्रत्येका वरच रोजचं जगणं मुश्किल व्हावा अशी परिस्थिती नव्हती तरीही पडद्यामागचे अनेक कलाकार यांना खरोखरच निराशा यावी अशी परिस्थिती होती. तरीही अनेक कलाकारांनी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, कधी स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करून, प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधून तर “आठशे खिडक्या नऊशे दार” यासारख्या टाळेबंदी स्पेशल सीरियल काढून. इतरांचं काय? हे मात्र अजून प्रकशात आलेलं नाही.
फॅशन डिझाइनिंग क्षेत्रावर परिणाम होऊन मुंबई येथील कारखाने तडकाफडकी बंद करावे लागले , ट्रेन बस आणि वाहतुकीची साधने बंद असल्याने कर्मचारी कामावर रुजू होऊ शकत नव्हते मिळेल त्या वाहनांनी ते गावी परतले सर्वत्र अनिश्चितता बेचैनी अस्थिरता भीती होती .पण एका नामांकित फॅशन डिझायनर ने एका ठिकाणी मत व्यक्त केले की “सर सलामत तो पगडी पचास”, या न्यायानुसार मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणतात ,”माझ्या ड्रेस कलेक्शन ची ओळख म्हणजे ते सस्टेनेबल असत. ज्याचा पुनर्वापर होणार नाही असं कोणतेही उत्पादन मी वापरत नाही अनेक वर्षांपासून नैसर्गिक उत्पादन वापरते थोडक्यात पर्यावरण विरोधी काम करतच नाही.”
आजची तरुण पिढी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातूनही पर्यावरणपूरक जीवनशैली योजना करत आहे हे बघून खूप चांगलं वाटतं. अनेक डॉक्टरांनी आणि पोलिसांनी प्राणाची बाजी लावून या दिवसात मधून काम केलं नर्सेस, ट्रॅफिक पोलीस ,सफाई कामगार यासारखे ज्याच्यावर ज्यांच्यावर दररोजचे जीवन अवलंबून आहे असे फ्रेट लाईनवर असणारे सगळे सेवाव्रती यांनी आपल्या कुटुंबांवर तुळशीपत्र ठेवून सतत जनतेची सेवा केली आणि मानवतेचा प्रत्यय आला .या मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित बाळाला स्वतःच्या तोंडाने श्वास घेऊन जीव वाचवणारे डॉक्टर आहेत हे यानिमित्ताने समाजाला कळलं.
मोठ्या उद्योगधंद्यांवर आणि त्यांच्या कामगारांवर झालेला परिणाम तर सगळ्यांना माहितीच आहे कोविडच्या भीतीमुळे केलेलं स्थलांतर याची खूप चर्चा झाली. त्यापैकी काही नावावी रोजगार मिळाला नाही म्हणून परत येण्यासाठीची पण धडपड सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर समाजाच्या उतरंडीवर राहणाऱ्या आणखीन एका उपेक्षित घटकावर झालेला परिणाम म्हणजे देहविक्रय करणाऱ्या महिला. शरीरास्पपर्षाशी निगडित असल्याने त्यांचा व्यवसाय बंद पडला. पुन्हा केव्हा सुरू होईल हेही माहीत नाही. त्यांचा रोजगार गेला. सुरुवातीला काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींनी मदत दिली. पण लॉकडाउन अमर्याद वाढतच गेला गेस्ट औषध पाणी स्वच्छतेची साधने यांचा खर्च वाढला. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि इतर प्रतिष्ठित विद्यापीठांनी भारताने रेडलाइट विभाग बंद करावे असा एक अहवाल जाहीर केला. प्रगत देशांची सुद्धा हा या महिलांकडे बघण्याची दृष्टी काय होती हे स्पष्ट झाले. याही काळामध्ये एका संस्थेने ज्या महिला व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहेत, म्हणजे त्यांना आकडेमोड करता येते अशांसाठी प्रशिक्षण आयोजित केलं निधी दिला, आणि त्या या प्रेरणेतून काहीजणींनी लहान मुलांचे कपडे विकण्याचा उद्योग, कुठे भाजी आणि चहा विकण्याचा उद्योग काहीजणी सुके मासे कांदे-बटाटे स्टेशनरी विकण्याचा उद्योग सुरू केला आहे.
फ्रेंड्स ! कोविड ने दिलेले धडे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कारण हेच की, तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाचा मनात ही लढण्याची ऊर्मी कायम अशीच टिकायला हवी .महामारीचा जोर आटोक्यात आलेला असला तरी, संकट संपले असे म्हणून बेफिकीरही राहता येणार नाही .परंतु काहीही होवो शेवटी माणसाची जगण्याची इच्छा चिवट आणि आशावादी असते हेच खरे! कितीही संकटे येवोत हार न जाणे हा केवढा मोठा आशावाद मानवामध्ये आहे .त्याला खरोखरच सलाम !
मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला