‘प्राण जाये पर वचन ना जाये’ म्हणत आदित्य ठाकरेंची युतीबाबत पुष्टी

Aditya Thackeray

मुंबई :- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही? हा प्रश्न अजून सुटलेला नसताना आम्ही युती तोडणार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांनीही ‘आता युती कायम राहणार’ असे सूचक विधान केले होते. त्यावर आता आदित्य ठाकरेंनीसुद्धा ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ असं सांगत शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी  एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती तुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जागावाटपावरून भाजप-सेनेमध्ये वाद आहे. जागावाटपाचा फार्म्युला हा समसमान असणार की शिवसेनेला भाजप ११५ ते १२० मतदारसंघच देणार, यावर सध्या मोठा सस्पेंस आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार का? यावर अजूनही दोन्ही पक्षांत  रस्सीखेच सुरू आहे.

विधानसभेच्या या पार्श्वभूमीवर मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुखांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर महत्त्वाची  बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना नेते राहतील. याच बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढायचे का की युतीत जागावाटपात तडजोड करून लढायचे, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना कमी जागा लढवून क आणि ड वर्गातील जागा लढवण्यास अजिबात इच्छुक  नसल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिवसेनेचे समाधान कसे करणार आणि शिवसेना राजी होणार का? याकडेच आता सर्वांचे  लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याची सुरुवात चिपळूणमधून होईल- जन आशीर्वाद यात्रा व विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे प्रतिपादन