निवडणूक पुन्हा होणार याची काळजी सर्वांनाच आहे – जयंत पाटील

Sanjay Raut-Jayant Patil

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत हायकमांडसोबत राज्यातील चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर कॉंग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काहीही वेळ न घेता लगेच प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. नाना पटोलेंच्या (Nana Patole) या निर्णयाने महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत (Shivsena) नाराजी आहे. मुख्यत्वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना पटोलेंनी आता हा निर्णय घ्यायला नको होता, असेच मत नोंदवले आहे. त्यातच ‘सामना’च्या अग्रलेखातून निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे असल्याचे म्हटले आहे. सामनातील या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कॉंग्रेसचे मन लागत नसून कोणत्याही क्षणी सरकार कोसळू शकेल, असे चित्र सध्या निर्माण होत आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील सध्या राज्याच्या दौ-यावर आहेत. ते वाशीममध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे. जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसला पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद दिलं होतं. काँग्रेसने एकाच वर्षात राजीनामा दिला, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. संजय राऊत यांना निवडणूक पुन्हा होणार, याबद्दल एकच काळजी वाटत असेल तर ती सर्वांनाच वाटत आहे, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. आजच्या सामनात काय म्हटले आहे?

“निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे”
आघाडी सरकारच्या काळात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुन्हा पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षांसाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल, असंही सामनाच्या अग्रलेखात सुचवलं आहे. तर, स्वतः संजय राऊत यांनीही सरकारच्या स्थिरतेबद्दल भीती व्यक्त केल्याचे दिसते. संजय राऊत म्हणाले- “शरद पवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद खुलं झालं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा होईल. सरकार स्थापन करताना पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद ठरलं होतं. तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील, हे कोणाला माहीत नव्हतं. त्यामुळे तीन पक्ष एकत्र निर्णय घेतील. तीन पक्षांचं बहुमत असलेलं हे सरकार आहे. त्यामुळे हा प्रकार टाळायला हवा होता. ” अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER