शरद पवारांचे गुणगान तर, ज्यांचा टेकू घेऊन सत्तेत आहेत त्यांचेच अग्रलेखातून वाभाळे, भाजपची सेनेवर खोचक टीका

Ram Kadam

मुंबई : दिल्लीच्यात वेेशीवर महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारत बंद, राष्ट्रपती भेट, दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेले पत्र अशा अनेक गोष्टी विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. पण ‘मरतुकड्या’ विरोधकांमुळे सत्ताधारी मोदी सरकारवर म्हणावा तसा दबाव येत नसल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली, असं म्हणत अपयशाचं खापर शिवसेनेने काँग्रेसच्या माथी फोडलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर खोचक टीका तर कॉंग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

“आजच्या सामनाच्या अग्रलेखात देशातील विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे. सध्याचा घडीला विरोधी पक्षातील नेते कमकुवत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर विखुरलेले आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र, देशभरात केवळ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. केवळ शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?”, असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदमांना एका अर्थाने असेच म्हणायचे आहे की, एकीकडे शरद पवारांचे गुणगान गायचे तर, ज्यांचा टेकू घेऊन सत्तेत आहेत त्यांचेच अग्रलेखातून वाभाळे, काढायचे असेच म्हणायचे आहे.

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखात विरोधी पक्षांच्या अपयशाचं खापर काँग्रेसवर फोडण्यात आलं आहे. “दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत दिल्लीतील सत्ताधारी कमालीचे बेफिकीर आहेत. सरकारच्या या बेफिकिरीचे कारण देशातील विस्कळीत, कमजोर झालेला विरोधी पक्ष आहे. निपचित पडलेल्या विरोधी पक्षाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही.

राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असे कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात? यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्री तोमर यांनाही देशातील शेतकरी गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती आहेच. मात्र तरीही सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे, हा आक्षेप उरतोच”, असे मत अग्रलेखात मांडण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER