क्रिकेट मंडळाच्या वार्षिक कराराबाबत कोणते तीन खेळाडू ठरले कमनशिबी?

Ipl - Maharastra Today

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठीचे 2020- 21 चे वार्षिक करार (Annual Contract) जाहीर केले आहेत. त्यात शुभमन गिल (Shubhaman Gill) व मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) पहिल्यांदाच करारबध्द खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांना वरची श्रेणी मिळाली आहे. भुवनेश्वर कुमार व युझवेंद्र चहल एक श्रेणी खाली आला आहे. तर कुलदीप यादव दोन श्रेणी खाली आला आहे. मनिष पांडे व केदार जाधव यांचीतर गच्छंती झाली आहे. अक्षर पटेलचे 2017-18 नंतर पुनरागमन झाले आहे.

आॕक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 साठी हे करार आहेत.

यामुळे कराराबध्द खेळाडूंमध्ये कुणाला प्रमोशन व कुणाला डिमोशन याची चर्चा सुरु असली तरी काही खेळाडू असे आहेत की ज्यांच्यात गुणवत्ता असूनही ‘ना प्रमोशन, ना डिमोशन’, त्यांचा करारासाठी विचारसुध्दा झालेला नाही. ह्या खेळाडूंची नावे ऐकाल तर तुम्हीसुध्दा म्हणाल की या खेळाडूंना करार मिळायला हवा होता. तर हे करार हुकलेले तीन खेळाडू म्हणजे टी. नटराजन (T Natrajan), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan).

आता टी.नटराजनबद्दल म्हणाल तर तो अतिशय चांगला गोलंदाज आहे असेच सर्व म्हणतील. झहीर खाननंतर भारताच्या चांगल्या डावखुऱ्या जलद गोलंदाजाची कमतरता त्याने भरुन काढली आहे. बरिंदर सरण, खलील अहमद व जयदेव उनाडकट यांच्यात जे सातत्य दिसले नाही ते नटराजनकडे दिसून आले आहे. आयपीएल 2020 गाजवल्यानंतर आॕस्ट्रेलियात मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्याने सोने केले आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सात बळी घेताना त्याची इकॉनाॕमी 7.62 ची आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो भारताचे प्रमुख शस्त्र ठरेल त्यामुळे त्याला करार मिळायला हवा अशी अपेक्षा होती.

गोलंदाजीत जसे टी. नटराजनचे तसेच फलंदाजीत सूर्यकुमार यादवची स्थिती तशीच आहे. दोन वर्षांपासून तो सतत फलंदाजीत चमकतो आहे. बहुप्रातिक्षेनंतर अलीकडेच त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आहे आणि इंग्लंडविरुध्दच्या दोन टी-20 डावात त्याने 185 च्या स्ट्राईक रेटने 87 धावा केल्या आहेत. आगामी काळातही तो भारतीय फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर खेळायची दाट शक्यता आहे पण सध्यातरी त्याला करार मिळालेला नाही.

सूर्यकुमारप्रमाणेच इंग्लंडविरुध्दच्या टी-20 मालिकेत इशान किशननेही प्रभावी पदार्पण केले. आयपीएल 2020 मधील त्याची कामगिरीसुध्दा लक्षणीय होती. आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातच त्याने 32 चेंडूत 56 धावांची खेळी केली आणि आपण भारतीय संघात आपले स्थान कायम राखू याची ग्वाही दिली. यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्यालासुध्दा करार मिळालेला नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 21 सप्टेंबर 2021पर्यंत करारबध्द केलेले खेळाडू असे..

ए प्लस श्रेणी- 7 कोटी रुपये

विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमरा

ए श्रेणी- 5 कोटी रुपये

रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, के.एल.राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पांड्या (पदोन्नती)

बी श्रेणी- 3 कोटी रुपये

वृध्दिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार (पदावनत) , शार्दुल ठाकूर (पदोन्नती) , मयंक अगरवाल

सी श्रेणी- 1 कोटी रुपये

कुलदीप यादव (पदावनत), नवदीप सैनी, दीपक चाहर, शुभमन गिल (पदार्पण) , हनुमा विहारी, अक्षर पटेल (पुनरागमन) , श्रेयस अय्यर, वाॕशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल (पदावनत) , मोहम्मद सिराज (पदार्पण)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button