कोणते शरद पवार खरे?

badgeशरद पवार यांना समजायला १०० जन्म घ्यावे लागतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. पण हजार जन्म घेतले तरी शरद पवार समजणार नाहीत असे म्हणायची वेळ शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज आली आहे. मुख्यमंत्रीपद पटकावून उद्धव यांनी आपली खुन्नस पूर्ण केली खरी. पण आता सिंहासनावर बसल्यानंतर खजिन्याच्या किल्ल्या शरद पवारांकडे आहेत असे त्यांच्या लक्षात आले. पवारांची अनेक रूपं आहेत. त्यामुळे त्यांना समजून घेताना अनेकांची गल्लत होते. उद्धव यांचीही अशीच गल्लत झाली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा. पण रिमोट पवारांकडे आहे.

महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प दोन लाख ४० हजार कोटी रुपयांचा आहे. यातल्या निम्म्या खर्चाची खाती राष्ट्रवादीच्या खिशात गेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या म्हणजे पर्यायाने पवारांच्या मर्जीने सरकार चालवणे उद्धव यांना भाग पडणार आहे. थोरल्या पवारांच्या धक्कातंत्राने राष्ट्र्वादीतले दिग्गजही थंडगार झाले आहेत. खातेवाटपाचा गोंधळ सुरु असताना ‘आमच्याकडे कुणी गृह खाते घ्यायला तयार नाही’ असे विधान पवारांनी केले होते. प्रत्यक्षात वास्तव वेगळे होते. अजितदादा पवार आणि दिलीप वळसे पाटील गृह खात्यासाठी बाशिंग बांधून बसले होते. अखेरच्या क्षणी गृह खाते विदर्भातील अनिल देशमुख यांच्याकडे देऊन पवारांनी पुतण्याची विकेट घेतली. जोखमीचे गृह खाते पाचव्यांदा मंत्री झालेल्या अनिल देशमुखांना देऊन पवारांनी शिवसेनेलाही चकित केले. विदर्भात राष्ट्रवादीची ताकद नाही असे कालपर्यंत बोलले जात होते. पण यंदा विदर्भातून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आल्याने पवारांनी जनाधार वाढवण्याची रणनीती म्हणून अनिलबाबुंना ताकद दिल्याचे मानले जाते. आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे असल्याने सत्ताकेंद्र नागपुरात होते. नगर विकास, गृह, ऊर्जा, अर्थ, वन, उत्पादन शुल्क अशी महत्वाची खाती विदर्भाकडे होती. यापैकी आता केवळ गृह आणि ऊर्जा ही दोनच महत्वाची खाती ठेवून पवारांनी विदर्भाचा दबदबा काही प्रमाणात कायम राखला.

खातेवाटपाचे गाडे मार्गी लागले असले तरी तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. खुद्द शिवसेनेतली नाराजी उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसमध्ये तर चांगलीच जुंपली आहे. राष्ट्र्वादीतही धुसफूस सुरु आहे. छगन भुजबळ, नवाब मलिक, वळसे पाटील यांचे पंख छाटले आहेत. पण राष्ट्रवादीचा कुणी नेता उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत नाही. शरद पवारांचा रिमोट बाहेरच नव्हे तर घरातही चालतो, असेच म्हणावे लागेल. महाआघाडीत नाराजी असली तरी हे सरकार पडणार नाही. पवार पाठीशी आहेत, राहुल गांधींची लहर फिरत नाही तो पर्यंत नाराजांपासून धोका नाही.