प्रकल्प हवा की नको, शिवसेनेतच दोन गट

ShivSena Flags

रत्नागिरी :- काही महिन्यांपूर्वी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध करणाऱ्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांना या विरोधातील फोलपणा आणि या विरोधामुळे होणारे नुकसान लक्षात आल्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला आहे. अशा पदाधिकाºयांवर शिवसेनेने कारवाई करण्यास सुरूवात केल्यामुळे आता शिवसेनेमध्ये दोन गटच पडू लागले आहेत. आधी प्रकल्प विरोधक विरूद्ध शिवसेना आणि प्रकल्प समर्थक असा वाद होता. आता प्रकल्प समर्थक शिवसैनिक विरूद्ध शिवसेना असाच वाद रंगू लागला आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांच्या चौकशीबद्दल गृहमंत्र्यांची भूमिका ‘नरो वा कुंजरो वा’

एन्रॉन प्रकल्पापासून ते अगदी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत प्रत्येक प्रकल्पाला सुरूवातीला शिवसेनेने कडाडून विरोध केला. प्रत्येकवेळी आम्ही लोकांच्या बाजूने आहोत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. मात्र कोकणात शिवसेनेने एकही प्रकल्प आणला नाही. रोजगार देऊ शकणाºया प्रकल्पांना विरोधाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने रोजगाराचे पर्याय आणण्यात पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून कोकणी तरूणांचेच नुकसान होणार आहे, असा मतप्रवाह वाढू लागला आहे.

शिवसेनेची साथ हवी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने रिफायनरी प्रकल्प रद्द केला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रेत राजापुरात अनेक प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला प्रकल्प हवाय, अशी भूमिका घेतल्यानंतर फडणवीस यांनी समाधान व्यक्त करून पुन्हा चर्चेची तयारी दर्शवली. शिवसेनेचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मात्र आधी किंवा आताही प्रकल्प समर्थकांशी एकदाही चर्चा केलेली नाही किंवा चर्चेची तयारीही दर्शवलेली नाही. आम्ही जनतेसोबत आहोत, असे सांगणारी शिवसेना किती लोकांना प्रकल्प हवाय, याचा विचार न करताच आता विरोधाची भूमिका घेऊन उभी असल्याने स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एका बाजूला प्रकल्प हवा असल्याचे त्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे. दुसºया बाजूला पक्षाची भूमिका ठाम विरोधाची आहे. सुमारे आठ हजार एकरची संमतीपत्र स्थानिक शेतकऱ्यानी जमा केलेली असतानाही शिवसेना नेतृत्व त्याकडे दुर्लक्ष का करत आहे, याचे उत्तर शिवसैनिकांनाही माहिती नाही. त्यामुळे पक्ष सांगतो म्हणून प्रकल्पाला विरोध करायचा की प्रकल्प हवा म्हणून पक्षाच्या विरोधात जायचे, असा संभ्रम अनेक शिवसैनिकांच्या मनात आहे. सद्यस्थितीत शिवसेनेत दोन गट पडले असून, बहुतांश कार्यकर्ते प्रकल्प व्हावा, या बाजूने झुकू लागले आहेत