‘सीरम’च्या आगीमागे घातपात की अपघात ते चौकशीतून कळेल -मुख्यमंत्री

Uddhav Thackeray.jpg

पुणे : कोरोना (Corona) लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करत आगीबाबतची माहिती जाणून घेतली. सीरममध्ये आग लागली की घातपात आहे, हे चौकशीतून स्पष्ट होईल, असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे.

चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, अदर पूनावाला, सायरस पूनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली? किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामगारांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाच्या संकटकाळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती. त्यामुळे सीरमला आग लागल्याचं कळताच काळजाचा ठोका चुकला.

मात्र, सुदैवाने जिथे लस तयार केली जाते तिथे आग लागली नाही. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. सीरमच्या या नव्या इमारतीतील दोन मजले वापरात होते. तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार होतं. तिथेच ही दुर्घटना घडली, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.  या आगीमागे घातपात होता की अपघात होता, हे आताच आपल्याला सांगता येणार नाही. तसं बोलणंही योग्य ठरणार नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांची जबाबदारी सीरमने घेतली आहे.

आवश्यकता पडल्यास सरकारही मदतीचा हात पुढे करेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या दुर्घटनेत लसीचं नुकसान झालेलं नसलं तरी रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लसीचं मोठं नुकसान झालं आहे. आगीत महत्त्वाच्या साहित्याचं नुकसान झालं आहे. पण सप्लाय लॉस झालेला नाही. मात्र हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं. भविष्यात आम्ही या इमारतीत कोरोनाची लस आणून ठेवणार होतो. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER