
सोलापूर :- महापालिकेचे उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष एवढ्याच स्थानिक पदांवर सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अनेक दिग्गज नेत्यांना आतापर्यंत समाधान मानावे लागले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूरला राज्याच्या सत्तेत आजपर्यंत संधी दिलेली नाही. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सोलापूर शहरासाठी महेश कोठे यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठी उभारी मिळणार, अशी अपेक्षा आहे. पण पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महेश कोठेंचे (Mahesh Kothe) आमदारकीचे स्वप्न पूर्ण करणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण कोठेंना आमदारकी देण्याचा अंतिम निर्णय हा शरद पवारांचाच असणार आहे.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 1999 पूर्वी माजी आमदार युन्नुसभाई शेख यांच्या आमदारकीपर्यंतच सोलापूर शहरातील नेत्याला ताकद दिली. या घटनेलाही आता 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मात्र तशी संधी सोलापुरातील एकाही नेतृत्वाला मिळू शकली नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यात राष्ट्रवादीला सत्तेची अनपेक्षितपणे संधी मिळाली. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने सोलापूर शहरासाठी महेश कोठे यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनाही राष्ट्रवादीने जाळ्यात अडकवले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
सोलापूर महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे माजी महापौर महेश कोठे यांनी भूषविली आहेत. महेश कोठे यांचे आमदार होण्याचे स्वप्न मात्र अद्यापही कायम आहे. कोठे आता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीच्या सत्तेचा वाटा सोलापूर शहरासाठी द्यायचा झाल्यास तो वाटा कोणाला मिळणार? नव्याने पक्षात आलेल्या व्यक्तींना की जुन्या व्यक्तींना? याची कुजबुज पक्षात सुरू झाली आहे.
ही बातमी पण वाचा : पवारांच्या मनात काय? जयंत पाटील आजपासून महाराष्ट्र पिंजून काढणार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला