उत्तर प्रदेशच्या घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण करणारे राऊत तेव्हा कुठे होते – प्रवीण दरेकर

Praveen darekar-Sanjay Raut

जालना: हाथरस येथील बलात्कार आणि हत्याकांडाची चौकशी झालीच पाहिजे. तशी मागणीही भाजपने (BJP) केली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील या घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण केलं जात आहे, असा घणाघाती आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. तसेच हाथरस प्रकरणावर पंतप्रधान का बोलत नाहीत? या शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या वक्तव्याचाही दरेकर यांनी यावेळी समाचार घेतला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर (Praveen Darekar) बदनापूरला आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हाथरस प्रकरणावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं.

यावेळी दरेकर म्हणाले की, रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या मुलीला दरीत फेकून देण्यात आले. पुण्यात एका तरुणीला डोंगरात नेऊन दगडाने ठेचून मारण्यात आले. त्यावेळी राज्य सरकार झोपले होते का? क्वॉरंटाइन सेंटरमध्ये बलात्कार होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर मात्र एक शब्दही काढला गेला नाही. त्यावेळी राऊत कुठे होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे. महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपासून ते राऊतांपर्यंत कोणीच बोलायला तयार नाही, असं सांगतानाच उत्तर प्रदेशातील घटनेवरून मात्र महाराष्ट्रात राजकारण केलं जात असून या लोकांची करणी आणि कथनी यात अंतर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. हाथरसमध्ये मीडियाला जाण्यापासून रोखणे चुकीचे असून मीडियामुळे अनेक प्रश्नमार्गी लागतात, असंही ते म्हणाले.

यावेळी दरेकर म्हणाले की, उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत दुर्देवी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, विरोधक उत्तर प्रदेशातील या घटनेवरून राजकारण करत आहेत, असं सांगतानाच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले नाही. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असलं तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. या घटनेच कुणीच समर्थन केलेलं नाही आणि करणारही नाही, असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER