‘जिथे अन्याय, तिथे शिवसेना’ : ऊर्मिला मातोंडकर

Shiv Sena - Urmila Matondkar

मुंबई :- प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना (Shiv Sena) स्थापन केली. ‘जिथे अन्याय, तिथे शिवसेना’ कायम लोकांसोबत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी कोणत्याही लोभाला बळी पडली नाही. त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून आपल्याला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास प्रबोधनकार ठाकरे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी व्यक्‍त केली.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्त ‘संवाद पुणे’तर्फे आयोजित ‘प्रबोधन महोत्सवा’चे उद्‌घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मातोंडकर बोलत होत्या.

यावेळी गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचे हिंदुत्व प्रबोधनकारी विचारांचे आहे. येथे जीवन व्यवस्थेला स्थान नाही. परंतु अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरा आज डिजिटल माध्यमातून पुन्हा समाजासमोर येत आहेत. अशा वेळी प्रबोधनकारांचे विचार तरुणांपर्यंत पोहचले पाहिजेत. त्यासाठी अधिकाधिक नवीन माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.

कन्नड अस्मितेच्या नावाखाली फडतूस संघटनांनी स्वत:ची मर्यादा सोडून मुद्दाम महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागामध्ये चिथावणी देणारी परिस्थिती निर्माण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या हितासाठी शिवसेना कायम खंबीरपणे पाठीशी आहे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

दरम्यान या कार्यक्रमात ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शिवसेना उपनेते, प्रबोधन युवा मंचचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, सुनील महाजन, शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण साळी, निकिता मोघे, सचिन इटकर उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : विरोधकांनी कितीही आरोप केले तरी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालणार : शरद पवार  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER