हसू कुठे हरवलं

हसू कुठे हरवलं

मालिका म्हटलं की वेगवेगळे ट्रॅक आलेच. कधी मालिकांमध्ये एखाद्या पात्राचे लग्न ठरतं आणि मग आनंदाने सगळे एपिसोड फ्रेश होतात. सण समारंभ जसे आपल्या घरात होतात तसे मालिकांमधील घरात होत असतात. मग छान छान साड्या , ड्रेस , सजवलेली मालिकांमधील घरे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. मालिकेतील घरात सुख दुःखही येणारच. सध्या अनेक मालिकांमध्ये नायिकांचे हसू हरवल्याचं दिसत आहे. हा सॅड ट्रॅकही तुफान लोकप्रिय होत असून चॅनेलसह कलाकारांच्या सोशल मीडिया पेजवर या दर्दभऱ्या ट्रॅकचे मार्केटिंग जोरात सुरू आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेत सून म्हणून दीपाला नकार देणाऱ्या सौंदर्यामुळे दीपाला खूप काही सहन करावं लागलं.त्यानंतरही तिच्यामागचा त्रास कमी झाला नव्हता. मात्र तिच्यावर असलेला कार्तिकचा विश्वास हे तिच्या आनंदाचे एकमेव कारण होते. सध्या मालिकेमध्ये दीपाच्या जन्माचे रहस्य शोधण्याचा ट्रॅक आल्यामुळे दीपाच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं आहे. त्यामुळेच या मालिकेत सध्या टेन्शन सुरू आहे. हे सगळं संपून कधी एकदा कार्तिक आणि दिपाचं हॅप्पी लाईफ सुरू होणार याकडे या मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आह.

गेल्याच महिन्यात नव्याने सुरू झालेल्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमध्ये ऑनलाईन लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत छान मजा मस्तीचा माहोल होता. तो माहोल आता ओसरला आहे . शंतनूचा भूतकाळ समोर आल्यामुळे शर्वरीला प्रचंड धक्का बसला आहे. मालिकेची नायिका शर्वरी ही सध्या सॅड लूकमध्ये तिच्या चाहत्यांना या मालिकेच्या माध्यमातून दिसत आहे. शंतनूने लग्नाला होकार दिल्यामुळे सदावर्ते या कुटुंबात आनंदी वातावरण होतं. मात्र ऐश्वर्या हिने या सगळ्यात काटा घालत केलेली एन्ट्री शर्वरीच्या चेहऱ्यावरच हसू हिरावून घेणारी ठरली आहे.

जीव झाला येडा पिसा या मालिकेतही सिद्धी ही आत्याबाईची मुलगी आहे कळल्यानंतर शिवाची आई म्हणजे मंगल हिने घातलेला धिंगाणा आणि एकूणच लष्करे कुटुंबामध्ये पडलेली मतभेदाची दरी यातून सध्या या मालिकेत दुःखाचा ट्रॅक मांडला जात आहे. शिवा आणि सिद्धी यांनी वेगळी चूल मांडल्यामुळे देखील घरातलं घरपण हरवले आहेच पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसूही गायब झाले आहे.

राजा राणीची ग जोडी या मालिकेतील रणजित ढाले पाटील आणि संजीवनी यांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना आवडत होती. पण या मालिकेचा मुख्य भाग असलेला म्हणजेच संजीवनी अल्पवयीन असूनही तिचं रणजितशी लग्न होणे आणि त्यानंतर हे गुपित कळल्यावर काय धमाका होणार याच्या प्रतीक्षेत या मालिकेचा चाहतावर्ग होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच हे सत्य उघड झाल्यानंतर संजीवनी आणि रणजित यांच्यात दुरावा आला आहे. पाटलांच्या घरात हसत-खेळत वावरणारी संजीवनी सध्या रडवेली दाखवण्यात आली असून हा ट्रॅक संपेपर्यंत तिच्या चाहत्यांना तिला असंच रडूबाई लूक मध्ये पहावे लागणार आहे. अग बाई सासुबाई या मालिकेतील अभिजीत राजे आणि आसावरी राजे ही जोडी देखील तुफान लोकप्रिय झाली होती. त्यांच्या दोघांच्या लग्नापासून ते त्यांचे राजस्थानला फिरायला जाणं , पन्नाशीत लग्न करूनही एखाद्या तरुण जोडप्याला लाजवेल असं एकमेकांवर प्रेम करणे, यातून अनेक आनंददायी प्रसंग या मालिकेच्या चाहत्यांनी पाहिले होते. मात्र आता अभिज किचन बबड्याच्या हाती सोपविल्यानंतर अभिजीत आणि आसावरी यांच्यावर एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. तसेच गेल्या काही दिवसातील एपिसोडमध्ये त्यांच्या अडचणी वाढल्याचेही दाखविण्यात आल्यामुळे हसती खेळती आसावरी सध्या खूप दुःखी असल्याचे दिसत आहे. माझा होशील ना या मालिकेत आदित्यवर जीवापाड प्रेम करणारी सई सध्या आदित्यचे प्रेम मिळवण्यासाठी पराकाष्ठा करत आहे. आदित्यचं लग्न ठरणार हे कळल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरच हसू उडाले आहे आणि म्हणूनच ती त्याला मिळवण्यासाठी तिच्या प्रेमाची परीक्षा द्यायला तयार झाली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांचाही एका विचित्र परिस्थितीत विवाह झाला. गौरीला जयदीपने बायको म्हणून जरी स्वीकारलं असलं तरी त्याचं ज्योतिकावरील प्रेम अजूनही कमी झालेले नाही. याचा नक्कीच गौरीला त्रास होत आहे. r गेल्या अनेक एपिसोडमध्ये गौरीचं खळाळून हसणं तिच्या चाहत्यांनी या मालिकेत पाहिलेलं नाही. श्रीमंताघरची सून या मालिकेतही सध्या टेन्शन्स आहेत. अनन्या श्रीमंताघरची मुलगी आहे शिवाय ती आपल्या बॉसची मुलगी आहे हे कळल्यानंतर अथर्व देखील उदास झाला आहे. तर नेमकं अथर्व मला का टाळतोय याचं कारणच अनन्याला कळत नसल्यामुळे ती देखील सध्या मालिका मध्ये अस्वस्थ दाखवण्यात आली आहे.

सध्या अशा अनेक मालिकांमध्ये नायिका दुःखाच्या छायेत असल्याचे दाखवण्यात येत असले तरी अशा प्रकारचे ट्रॅक मालिकेला लोकप्रियता मिळवून देत असतात हेदेखील सिद्ध झाले आहे. जेव्हा नायक नायिकांमध्ये कोणत्याही कारणाने दुरावा येतो किंवा नायिका दुःखात बुडते तेव्हा ते दोघं परत एकत्र यावेत याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. बहुतांशी मालिकांमध्ये हीच दर्दभरी कहाणी सुरू असून नव्या वर्षात मालिकांमधील कथेत सुरू असलेले प्रॉब्लेम संपतील अशी अपेक्षा प्रेक्षक करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER