दिशाहीन राज ठाकरे

Raj Thackrey

badgeसारे राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला भिडले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे कुठे दिसत नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘अनाकलनीय’ इतकीच प्रतिक्रिया टाकून ते बेपत्ता झाले आणि आता उगवलेले दिसत आहेत. लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही; पण विधानसभा लढवण्याची त्यांची खटपट दिसते आहे. गेल्या महिन्यात ते सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटले. निवडणूक महाराष्ट्रात आहे आणि हे दिल्ली, बंगालमध्ये बसलेल्या नेत्यांना भेटत आहेत; पण ह्या नेत्यांना हल्ली विचारतो कोण? त्यामुळे त्यांना नेमके काय हवे? निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत?

२००९ मध्ये लढलेल्या निवडणुकीत १३ आमदार निवडून आणून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र राज ठाकरे आज त्याच ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त करीत आहेत. भाजप ईव्हीएममध्ये गडबड करतो आणि निवडणूक जिंकतो असा त्यांचा आरोप आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून जनजागृती चालवली आहे; पण ईव्हीएम हा निवडणुकीचा मुद्दा होऊच शकत नाही. जनतेला तो मान्य होणार नाही. हरणारा ईव्हीएमच्या विरोधात ओरडतो आणि जिंकणारा गप्प बसतो. आपली कन्या सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर शरद पवार कुठे ईव्हीएमच्या विरोधात बोलताना दिसतात? टोकाचा मोदीविरोधही कामाला येत नाही हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. ठोस मुद्दा घेऊन राजसाहेबांनी उभे राहिले पाहिजे.

शिवसेना सोडल्यानंतर मराठी माणसाच्या मुद्द्यावर राज ठाकरे उभे राहिले. परप्रांतीय लोंढ्याच्या विरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रीय पक्षांनी त्यांना वाळीत टाकले. आता राजसाहेबांच्या हालचाली पाहिल्या तर साहेबांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना पडला असणार. एकेकाळी हेच राज ठाकरे नरेंद्र मोदींचे समर्थक होते; पण पुढे कट्टर विरोधक बनले. मोदींना पकडून शिवसेनेला उखडून टाकण्याची रणनीती फसली आणि राज भरकटत गेले. सभेत काँग्रेसवाल्यांच्या नकला करून ते टाळ्या घेत असत; पण आता दोन्ही काँग्रेसवालेच विरोधी बाकांवर आल्याने नकला संपल्या. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी राजसाहेबांना वापरून घेतले. तिथेही तोंडघशी पडल्याने त्यांचे उपद्रवमूल्य
हरपले आहे. निवडणुकीला दोन महिने उरले असताना आपल्या साहेबांचा यावेळी काय विचार आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत असणार? आगामी निवडणूक कुठल्याही परिस्थितीत त्यांना लढवावीच लागेल. ते स्वबळावर लढतात की शरद पवार किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत लढतात ह्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

ही बातमी पण वाचा : ‘काश्मीरमध्ये प्लॉट घ्यायचा का?’