भाजपा खासदाराने विमानाने आणलेले इंजेक्शन्सचे खोके नेमके कुठे नेले गेले?

aurangabad bench high court - Remedesivir - Maharashtra Today
  • औरंगाबाद खंडपीठाने दिला शोध घेण्याचा आदेश

औरंगाबाद : अहमदनगरचे भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिल्लीहून ‘चार्टर्ड’ विमानाने आणलेले व शिर्डीच्या विमानतळावर उतरवून घेतलेले ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन्सचे खोके त्यानंतर नेमके कुठे नेण्यात आले हे शोधून काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन बेकायदा  प्राप्त करून त्याचे वाटप केल्याबद्दल खासदार विखे-पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून फौजदारी खटला भरला जावा, अशी याचिका अरुण पुंजाजी कडू यांच्यासह चौघांनी केली आहे.

त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्या. रवींद्र घुगे व न्या. भलचंद्र देबडवार यांच्या खंडपीठाने दिलेला हा आदेश गुरुवारी रात्री उशिरा उपलब्ध झाला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वरीलप्रमाणे तपास करून ३ मे रोजी न्यायालयात अहवाल द्यायचा आहे. १०  ते २५ एप्रिल या दरम्यान शिर्डी विमानतळावर उतरलेल्या खासगी ‘चार्टर्ड’ विमानांच्या नोंदी आणि खासकरून त्या विमानांमधील उतरवून घेण्यात आलेल्या मालासंबंधीचे ‘सीसी टीव्ही’चे फुटेज जतन करून ठेवले जावे, असे निर्देशही न्यायालयाने गृह खात्याच्या प्रधान सचिवांना दिले. विमानांच्या ‘लॅण्डिंग’संबंधीच्या नोदी आणि ‘सीसीटीव्ही’ फुटेज गहाळ झाले किंवा सापडत नाही अशा कोणत्याही सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही खंडपीठाने दिला. खासदार सुजय विखे-पाटील यांनी इंजेक्शनच्या नेमक्या किती कुप्या आणल्या? ती इंजेक्शन्स  त्यांनी कोणाकडून आणली? अती खासगीपणे इंजेक्शन आणणे कायदा आणि नियमाला धरून आहे, इत्यादी प्रश्नांची उकल होण्याची गरज असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

मात्र अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र बी. भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन व आता न्यायालयात अहवाल सादर करून खासदार विखे-पाटील यांच्या कृतीचे समर्थन  करण्याचा ज्या प्रकारे प्रयत्न केला आहे ते पाहता यासंबंधी चौकशी करण्याच्या कामी जिल्हाधिकार्‍यांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे प्रथमदर्शनी मतही खंडपीठाने नोंदविले. हे मत खोडून काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आणखी काही सांगायचे असेल तर ते सांगण्यासाठी त्यांना तीन दिवसांचा वेळ देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात दिलेली माहिती अशी : डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशनने विलादघाट येथील त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या सध्या बंद असलेल्या इस्पितळाच्या २०० खाटा कोरोना  रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्याची परवानगी मागितली. अत्यावश्यक औषधे व ऑक्सिजनची व्यवस्था स्वत: करण्याच्या अटीवर त्यांना ही परवानगी देण्यात आली.

नंतर इस्पितळाने ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची टंचाई भासत असल्याने ती उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार मेडिकल कॉलेजच्या मेडिकल स्टोअरने १,७०० इंजेक्शन्ससाठी एकूण २५ लाख ७० हजार रुपये जिल्हा रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केले. सिव्हिल सर्जननी तेवढ्या  इंजेक्शन्ससाठी ऑर्डर नोंदवून विखे-पाटील रुग्णालयाने पाठवलेले पैसे पुरवठादाराकडे जमा केले. त्यानुसार पुण्याच्या सदाशिव पेठेतील मे. फार्मा डील या पुरवठादाराने १,७०० इंजेक्शन्स  सिव्हिल सर्जनकडे सुपूर्द केली. पुढे ती इंजेक्शन्स सिव्हिल सर्जनने  विखे-पाटील मेडिकल कॉलेजच्या इस्पितळास दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीची नोंद घेत खंडपीठाने म्हटले की, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, जिल्हाधिकारी ज्या १,७०० ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन्सची गोष्ट करत आहेत ती ‘चार्टर्ड’ विमानाने आणून शिर्डी येथे उतरवून घेतलेल्या इंजेक्शन्सच्या साठ्यापैकी नाहीत. असे असेल तर मग दिल्लीहून आणलेली इंजेक्शन्स  शिर्डीहून पुढे कुठे नेण्यात आली व ती कोणासाठी वापरली गेली, असे प्रश्न निर्माण होतात, असे म्हणून खंडपीठाने त्याचा तपास करण्यास सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे सांगितले.

रुग्णांच्या नातेवाइकांचा अर्ज फेटाळला

खासदार डॉ. विखे-पाटील यांनी आणलेली इंजेक्शन्स ज्यांच्यासाठी वापरली गेली अशा कोरोना रुग्णांच्या सत्यजित दिलीप घोलप यांच्यासह पाच नातेवाइकांनी या याचिकेच्या सुनावणीत सहभागी होऊ देण्यासाठी अर्ज केला होता. खासदार विखे-पाटील यांनी त्यांच्या ओळखीचा उपयोग करून इंजेक्शन्स आणल्याने अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गरीब रुग्णांचे प्राण वाचले. खासदार साहेबांनी काहीही गैर केलेले नाही. उलट रुग्णांच्या मदतीसाठी ते देवदूतासारखे धावून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे या अर्जदारांचे म्हणणे होते. खंडपीठाने तो अर्ज फेटाळताना म्हटले की, खासदारांनी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी काही गैर केले असले तरी त्यांना  दोष देता येणार नाही, या त्यांच्या म्हणण्याचे आम्हाला आश्चर्य वाटते. त्यांच्या या म्हणण्यावरून आम्हाला ‘रॉबिनहूड’च्या गोष्टीची आठवण येते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button