
कोण आहेत हे महेश कोठे? त्यांना अचानक इतके महत्त्व का आले? हे कोठे अचानक शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. कोठे आहेत सोलापूरचे. त्यांचे वडील विष्णुपंत कोठे हे निष्ठावंत काँग्रेसजन आणि त्याहीपेक्षा काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे (ShushilKumar Shinde) यांचे अत्यंत विश्वासू होते. शिंदेंचे सोलापुरातील सर्व राजकारण विष्णुपंत बघायचे; पण शेवटच्या चारपाच वर्षांमध्ये ते शिंदेंपासून दूर गेले. नंतर त्यांचे पुत्र असलेले महेश (Mahesh Kothe) यांना आमदारकीची स्वप्न पडू लागली. पण त्यांना आमदारकीसाठी सामना करायचा होता तो शिंदे यांच्या आमदार कन्या प्रणिती यांच्याशी.
कारण, मध्य सोलापुरातच कोठेंनाही लढायचे होते. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोठे शिवसेनेत गेले. आता शिवसेना त्यांना नक्कीच उमेदवारी देणार असे मानले जात होते; पण का कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक, शिवसेनेने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिली. भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढत होते. मानेंना उमेदवारी दिल्याने मग कोठे यांनी बंड केले आणि ते अपक्ष उभे राहिले. जोरदार लढत झाली पण प्रणिती जिंकल्या. दुसऱ्या क्रमांकावर एमआयएमचा उमेदवार राहिला. कोठे तिसऱ्या क्रमांकावर तर माने चौथ्या क्रमांकावर राहिले. महेश कोठे हे नगरसेवक आहेत, त्यांचे एक पुतणे, एक मेहुणेही नगरसेवक आहेत.
महेश यांचे स्वत:चे १३ नगरसेवक आहेत. सोलापूरच्या राजकारणातील बडे प्रस्थ अशी त्यांची ओळख आहे. गेले काही दिवस अशी चर्चा सुरू झाली की, कोठे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काल सोलापुरात अशी चर्चा रंगली की, कोठे हे शुक्रवारी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत मनगटावर घड्याळ बांधणार आहेत. शुक्रवारी मोठे नाट्य घडले. राष्ट्रवादीने भाजपची माणसे फोडण्याला शिवसेनेचा आक्षेप नाही; पण स्वत:चा विस्तार करताना आता राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्याच नेत्या, कार्यकर्त्यांवर जाळे टाकणे सुरू झाले म्हटल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता पसरली. माहिती अशी आहे की, कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची तीव्र नाराजी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे कळविली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कोठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश अडला. दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी असे ट्विट केले की, महेश कोठे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तिकडे सोलापुरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पत्रपरिषद घेऊन महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली.
शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर कोठे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे ट्विट काही तासांतच डिलिट करण्यात आले. त्यामुळे कोठे आता नेमके कोठे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला. पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने एकतर कोठेंसारख्या एका जिल्ह्यातील नेत्याच्या प्रवेशाचे ट्विट करायला नको होते आणि केलेच तर ते मागे घेण्याची नामुष्की यायला नको होती, अशी चर्चा या निमित्ताने रंगली. महेश कोठे हे सध्या मुंबईतच आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढतील, त्यांचे मन वळवतील आणि मगच कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाईल, असे म्हटले जाते. तिकडे नाशिकमध्ये माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल या दोन नेत्यांना शिवसेनेत परत आणून भाजपला धक्का देण्यात आला.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. गीते प्रदेश भाजपचे पदाधिकारी आहेत. पूर्वी ते मनसेत होते. मूळचे ते शिवसैनिक. शिवसेना, मनसे, भाजप आणि आता पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास राहिला आहे. सुनील बागुल शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेना सोडून ते राष्ट्रवादीत आणि नंतर भाजपमध्ये गेले होते. त्यांच्या आई भिकूबाई बागुल या भाजपकडून उपमहापौर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.अलीकडेच ते पुन्हा भाजपमध्ये परतले. शिवसेनेने आज त्याचे उट्टे काढले.
ही बातमी पण वाचा : शिवसेनेला धक्का ; अखेर महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश ; शरद पवारांची माहिती
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला