कुठे अटलजी, यशवंतराव अन कुठे आजचे नेते?

Gopinath Munde -Atal Bihari Vajpayee- Yeshwantrao Chavan - Vilasrao Deshmukh

1967 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे एक शिबिर महाबळेश्वरमध्ये भरले होते.तेव्हाची काँग्रेसची शिबिरे ही अतिशय गांभीर्याने होत. एक प्रकारची शिस्त पूर्ण शिबीरभर असे. त्या शिबिरात बोलताना थोर नेते यशवंतराव चव्हाण यांनी एक मोलाचा सल्ला दिला होता. “निवडणूक असो व नसो आपल्या पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जाहीर सभा कार्यक्रमांमध्ये काय बोलावे याचा तर अभ्यास करावाच पण काय बोलू नये याचे पथ्यही पाळले पाहिजे” असे त्यांनी अतिशय कळकळीने व वडीलकीच्या नात्याने सांगितले होते. गोपीचंद पडळकर, अनिल गोटे, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानांच्या पार्श्‍वभूमीवर यशवंतरावांच्या त्या वाक्याची आवर्जून आठवण होत आहे.

एकदा ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांनी सहकार चळवळविषयी काही अनुद्गार काढले. सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे, असे ते म्हणाले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली.काही ठिकाणी शंकररावजींचा निषेध करण्यात आला.त्यावेळी ज्येष्ठ विचारवंत व काँग्रेसचे महान नेते बाळासाहेब भारदे यांनी शंकररावांच्या एका जवळच्या माणसाला एक सल्ला दिला.” शंकररावांना सांगा की सरसकट अशी विधाने करू नयेत. मराठीमधील दोन शब्द भाषणात वापरले तर आपल्यावरील टीका सहज कळू शकते” म्हणजे शंकररावजींनी जर, “महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील बहुतेक लोक चांगले आहेत पण काही भ्रष्ट लोकांनी ही चळवळ बदनाम केली आहे” असे विधान केले असते तर कटुता टळून त्यांच्यावर टीका झाली नसती.

विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. दोघांचे खरेतर खूप मैत्र पण विधानसभेत एकदा जोरदार भाषण देताना मुंडे यांनी गढीवर राहणाऱ्या देशमुखांना गरिबांचे दुःख काय कळणार? असा हल्ला चढवला. त्यावर “मी गरिबी अनुभवली नाही पण जवळून बघितली आहे आणि गरिबाचे दुःख दूर करण्यासाठी मी राजकारण व समाजकारणाचा उपयोग केला असे सुसंस्कृत उत्तर देशमुख यांनी दिले.

यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई या स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्याला मूलबाळ नव्हते हा धागा पकडून प्र. के.अत्रे यांनी यशवंतरावांना निपुत्रिक म्हटले. त्यावर संवेदनशील मनाचे यशवंतरावाना अपार दुःख झाले पण म्हणून त्यांनी अत्रेंविरुद्ध कुठलीही जाहीर बयाणबाजी केली नाही. स्वातंत्र्यलढ्यात जुलमी ब्रिटिश पोलिसांनी वेणूताईंना जबर मारहाण केली आणि त्यामुळे त्यांना नंतर मूल होऊ शकले नाही, हे यशवंतरावांनी अत्रे यांना सांगितले तेव्हा अत्रे पार खजिल झाले. आपल्या वैयक्तिक जीवनातील अत्यंत हळव्या अशा गोष्टीवर जहरी टीका अत्रेंनी केली तरीही यशवंतरावांनी सुसंस्कृतपणा आणि संयम सोडला नाही. महाराष्ट्रात सुसंस्कृतपणाची ही परंपरा आज पार विसरली गेली आहे. यशवंतरावांचे पायिक म्हणणारेदेखील त्यांची शिकवण विसरले आहेत.

बांगलादेश निर्मितीच्या युद्धात पाकिस्तानला नमविण्यात भारताला यश आले बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांच्या अभिनंदनाचे भाषण करताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एकदा अटलजी आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम समोरासमोर आले. अटलजी त्यांना नमस्कार करीत म्हणाले जय भीम! आणि त्यांना प्रतिसाद देत,कांशीराम म्हणाले, जय श्रीराम! परस्परांच्या विचारांचा आदर कसा राखावा याचा तो वस्तुपाठ होता.

शरद पवार यांच्याबाबत पडळकर बोलले त्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. पण अनिल गोटे हे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जे पातळी सोडून बोलले त्याचाही तेवढाच निषेध झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांना प्रचंड बहुमत देऊन देशाने दुसऱ्यांदा पंतप्रधान केले. त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कुवत नसताना बरळणाऱ्या खालच्या पातळीतील होणारी ही बयाणबाजी तातडीने थांबणे निकोप राजकारणासाठी नितांत आवश्यक आहे. सुदृढ लोकतंत्रासाठी संवादाचा विसंवाद होणे हे भविष्यात घातक ठरू शकते…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER