ओबीसी नेते कुठे आहेत? ते बोलत का नाहीत?

MPSC Exam

एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारने जो निर्णय घेतला त्याचे दोन्ही बाजूंनी पडसाद उमटणे साहजिक होते.मराठा समाजाच्या नेत्यांनी त्याबाबत आनंद व्यक्त केला.कारण ही परीक्षा पुढे ढकलावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. त्यात मराठा क्रांती मोर्चा., शिवसंग्राम, मराठा आरक्षण संघर्ष समिती आदींचा समावेश होता.काही मराठा संघटनांनी परीक्षा घ्यावी अशी भूमिका घेतली होती पण सरकारने ती मान्य केली नाही आणि अखेर परीक्षा रद्द केली.मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे एमपीएससीची परीक्षा घेऊ नये अशी स्पष्ट भूमिका छत्रपती संभाजी राजे, विनायक मेटे आदी मराठा नेत्यांनी घेतली होती. त्याच वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही परीक्षा घेतली पाहिजे अशी भूमिका निर्णयापूर्वी मांडली पण परीक्षा रद्द झाल्यानंतर हा निर्णय चुकीचा होता असे अवाक्षरही बहुजन समाजाचे नेते म्हणणारे भुजबळ यांनी काढले नाही. अन्य पक्षांमधील बहुजन नेत्यांचा विचार केल्यास राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे,जितेंद्र आव्हाड, भाजपच्या पंकजा मुंडे यांनीही निर्णयाचा निषेध केला नाही. पंकजा सध्या अमेरिकेत आहेत.

शिवसेनेतील बहुजन नेत्यांनी बोलण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण तेथे मातोश्रीचा शब्द अंतिम असतो आणि त्यावर कोणताही प्रतिवाद कधीही चालत नाही. काँग्रेस पक्षातील बहुजन नेते नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत सदर अध्यक्षपद सांसदीय स्वरूपाचे असते. त्यामुळे त्या पदाची एक वेगळी प्रतिष्ठा आहे आणि अशा विषयांमध्ये त्या पदावरील व्यक्तीने प्रतिक्रिया देणे अपेक्षित नसते.छगन भुजबळ यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी चा लढा काही वर्षे चालवला मात्र अलीकडे समता परिषदेचे अस्तित्व नगण्य झाले आहे एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे यासाठी समता परिषद कुठे रस्त्यावर आल्याचे दिसले नाही. एरवी जितेंद्र आव्हाड कुठेही गोष्टीसाठी प्रतिक्रिया द्यायला आणि चॅनेलच्या दांड्यासमोर स्वतःला पेश करण्यासाठी तत्पर असतात पण त्यांनी यावेळी बोलण्याचे टाळले. धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधानपरिषदेची संधी दिली परंतु पडळकर यांना कधी काय बोलावे कोणता विषय हाती घ्यावा याचे नीटसे भान दिसत नाही. एमपीएससी परीक्षा वरून हजारो ओबीसी,धनगर विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले असताना पडळकर हे रोहित पवार यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दर्जावर टिवटिवाट करत बसले.

बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार हे काँग्रेसमधील नवे ओबीसी नेते म्हणून समोर येत आहेत. ते स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. ‘तलवार कधी उपसायची हे आपल्याला बरोबर समजते, योग्यवेळी आपण ती उपसल्याशिवाय राहणार नाही’ या छत्रपती संभाजीराजे यांच्या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला परंतु वडेट्टीवार यांच्या विरोधाला मर्यादा आहेत. एक तर काँग्रेस पक्षाने ते बहुजन समाजाचे काँग्रेस पक्षातर्फे नेते आहेत असे शिक्कामोर्तब आतापर्यंत केलेले नाही. दुसरे म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये जिथे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना मर्यादा आहेत तिथे वडेट्टीवार यांना तर अधिक मर्यादा पडतात.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील मराठा नेत्यांना अंगावर घेण्याची विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांची बहुधा तयारी नसते. एखादीच रणजित देशमुख यांच्यासारखे नेते असतात की जे त्यांच्या अंगावर जायला मागेपुढे पाहत नाहीत. अर्थात रणजीतबाबूंनी अशा अंगावर घेण्याचे खूप तोटेही त्यांच्या राजकीय जीवनात सहन केले. हा पूर्वानुभव लक्षात घेता आपले हात पोळून घेण्याची विदर्भातील काँग्रेसचे नेत्यांची गेल्या काही वर्षात तयारी दिसत नाही त्यातल्यात्यात नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे आक्रमक आहेत त्यामुळे बहुजन समाजाची त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. सर्वच मोठ्या राजकीय पक्षांमधील बहुजन नेते सध्या बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज आहे. राजकीय भेदांच्या पलीकडे जाऊन ओबीसी नेत्यांची मुठ बांधणारा मोठा नेता आज दिसत नाही. काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे हा प्रयत्न करायचे आणि त्यातून एक ओबीसी नेत्यांचा दबावगट निर्माण झाला होता. मात्र आज त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाची कमतरता आहे. मराठा समाजाचे नेते पक्षीय भेदांची भिंत ओलांडून एकत्र येतात आणि सरकारला झुकवतात. तशी ताकद ओबीसी नेत्यांनी दाखवण्याची वेळ आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER