शरद पवार कुठे आहेत?

sharad pawar

badgeराष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्यासारखा ‘चाणक्य’ महाराष्ट्रात दुसरा नाही. रणनीती आखण्यात पवारांचा हात कुणी पकडू शकत नाही हे त्यांचे विरोधकही खासगीत कबूल करतात. त्यांच्या मनाचा थांगपत्ता त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही नसतो. ह्या वयातही लढण्याची पवारांची खुमखुमी गेलेली नाही. म्हणूनच ‘हाऊ इज द जोश’ म्हणत लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता; पण ‘चेला’ गुरूला सव्वाशेर निघाला. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने काँग्रेसला धोबीपछाड देताना पवारांचे पश्चिम महाराष्ट्रातील साम्राज्यही बरेचसे खालसा केले. शरद पवारांची सुकन्या सुप्रिया सुळे बचावल्या; पण पुतणे अजितदादा यांचा मुलगा पार्थ पराभूत झाला. लोक मोदींवर नाराज आहेत असा सामान्य लोकांप्रमाणे त्यांनीही समज करून घेतला. आणि आपल्याच सापळ्यात ते अडकले. लोकसभेतल्या ह्या धक्क्यातून शरद पवार अजून पुरेसे सावरलेले दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीच्या नेत्यांनी दोन्ही काँग्रेसमध्ये मोठी फोडफाड चालवली असताना शरद पवार शांत आहेत. ते कुठल्या भूकंपाची तयारी करत आहेत? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

भाजपचे नेते काँग्रेसचे आमदार फोडत होते तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गालातल्या गालात हसत होते; पण आता भाजपने राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला आहे. चंद्रकांतदादा यांच्यासारखा रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा खतरनाक सेनापती भाजपने आणला आहे. चहुबाजूने भाजप अशी घेराबंदी करत आहे. राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडण्यासाठी तोफखाना सज्ज असताना आणि विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना शरद पवार यांच्याकडून प्रतिहल्ला होताना दिसत नाही. अजित पवार बॅटिंग करताना दिसतात; पण दादांना कुणी फारसे गंभीरपणे घेत नाही. जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर आता पांडुरंग बरोरा यांना युतीने पळवले.

नगरचे संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची दोन दिवसांपासून चर्चा आहे. आघाडीकडून निवडून येण्याची शक्यता नसल्याने ह्या आमदारांना युतीचे वेध लागले आहेत. अनेकांनी खडा टाकून ठेवला असून मुहूर्ताची वाट पाहात आहेत. स्वतःचा किल्ला उद्ध्वस्त व्हायची भीती असताना शरद पवार कुठे आहेत? त्यांच्यातला ‘कळलाव्या नारद’ संपला का? असा प्रश्न आता युतीच्या नेत्यांनाही पडू लागला आहे. काहीतरी गूढ बोलून सतत मीडियाच्या प्रकाशझोतात राहण्याची सवय असलेल्या पवारांच्या ह्या तटस्थतेचीही चर्चा आहे.