कचरा उठावासह प्रक्रियेची क्षमता वाढणार कधी?

Garbage Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर :- शहरातील कचरा उठावासाठी ॲटोटिपर आणि जुन्या आरसी यादोन्ही माध्यमातून कचरा उठाव केला जातो. टिपरचे प्रभावी नियोजन होत नसल्याने यातून रोज सरासरी ५० टन कचरा उठाव होतो. तर आरसीमधून १३०टन कचरा वाहून आणला जातो. तुलनेत परवडणाऱ्या ऑटोटिपरचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्याची गरज व्यक्त होत आहे. कचरा उठावासह त्यावर प्रभावीपणे प्रक्रिया केल्यानंतरच शहर कचरा समस्यातून मुक्त होईल.

शहरात दैनंदिन १८० टन कचरा संकलीत होतो. स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून घेतलेल्या १०४ ॲटो टिपरमधून ओला व सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते. दरवर्षी कचरा कोंडाळा खरेदीत दोन कोटी पेक्षा अधिकची रक्कम खर्च करण्यापेक्षा एकाचवेळी चार कोटी खर्च करुन ऑटोटिपर घेण्याची योजना राज्यभर अंमलात आली.

नूतन महापौर पहिल्याच दिवशी पडल्या कामासाठी बाहेर

आरसी गाड्यातून कचरा उठाव करताना जागोजागी कचऱ्याचे ढिग साचतात. याशिवाय आरसी गाड्यातून एकत्रितपणे कचरा येत असल्याने ओला आणि सुका असे वर्गीकरण होत नाही. ॲटोटिपर आणि आरसी गाड्यांसाठी कचरा उठावासाठी सारखाच म्हणजे सरासरी ८०० रुपये प्रतिटन खर्खच येतो. ॲटोटिपर गाड्यांचे योग्य नियोजन केल्यास शहर कचरा कोंडाळामुक्त होण्यास मदत होणार आहे.

शहरातील सर्व कचरा गोळा करुन तो कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये टाकला जात आहे. एकाच ठिकाणी कचरा साचून कचऱ्यांचा डोंगर तयार झाला आहे. पर्यायी जागा उपलब्ध झाली नसल्याने कचरा टाकायचा कोठे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन विविध पर्यायांचा अवलंब करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. मात्र या प्रकल्पाचे दृष्य परिणाम अध्याप पुढे आलेले नाहीत.

सक्षम पर्याय नसल्याने शहरातील कचरा प्रश्न नागरिकांच्या मुळावर उठला आहे. शहरात रोज १८० टन कचऱ्याची निर्मीती होत असली सर्वच सर्व कचऱ्याचा रोज उठाव करुन त्यावर प्रक्रिया केली जात नाही. एक किलो कचरा उठावासाठी कामगार पगारासह अंदाजे प्रतिकिलो कचरा १५ रुपये खर्च करुनही शहरात भरुन वाहणारे कोंडाळे हे चित्र कायम आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुनही कचऱ्याने भरुन वाहणारे कोंडाळे नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहेत. भरुन वाहणारे कोंडाळे शहराची प्रतिमा खराब करुन पर्यटनावरही विपरीत परिणाम करणारे ठरत आहेत.