केव्हा बनणार सरकार?

NCP-Congress, Shivsena

badgeमहाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांना हा प्रश्न पडला आहे. सरकार केव्हा मिळणार? इथे लोकांचा काहीही दोष नाही. लोकांनी पक्षांतर केलेले नाही. लोकांनी युतीला कौल दिला. ह्या युतीतल्या शिवसेनेने आघाडीत उडी मारल्याने सध्याची सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा विकास हाच नव्या सरकारचा अग्रक्रम असेल असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. पण ते अर्धसत्य आहे.दोन्ही काँग्रेसला मलईदार खाती हवी आहेत. सत्तेचे वाटप ठरत नसल्याने सरकार लांबते आहे.

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार उद्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. ह्या भेटीत महाशिवआघाडीची गाडी पुढे धकेल अशी आशा आहे. पण पवारांनी कालच नागपुरात बोलताना धाकधूक वाढवली. ‘दोन दिवसात सरकार अवघड आहे’ असे पवार म्हणाले. ‘घाई केली तर मामला बिघडेल’ असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणत आहेत. ‘फार थांबावे लागणार नाही’ असा दोन्ही काँग्रेसचा सूर आहे. पण जास्त म्हणजे किती? जनतेचा किती अंत पाहणार?

महाराष्ट्रातील नवीन समिकरणाने भाजपच्या पोटात दुखत आहे : सामना

क्रिकेट आणि राजकारणात शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकते असे सांगून भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाशिवआघाडीतले टेन्शन वाढवले आहे. ‘आम्ही सरकार बनवू शकत नाही’ असे राज्यपालांना सांगणारे भाजप नेते आता ‘भाजपचेच सरकार येणार’ असे सांगत सुटले आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर असा काय फरक पडला की भाजपकडे बहुमत आले? मित्रपक्ष धरून भाजपकडे ११९ आमदार आहेत. बहुमतासाठी १४५ आमदार पाहिजेत. म्हणजे आणखी २६ आमदार हवेत. ते आणायचे म्हणजे भाजप फोडाफोडी करणार आहे का? की आणखी काही जादू करणार आहे? शरद पवार काही भूकंप घडवणार आहेत का? काहीतरी गडबड आहे. संभ्रमाचे वातावरण आहे. पवार आणि सोनिया यांनी काही निर्णय करून कोंडी फोडली पाहिजे. तब्बल २१ दिवस सरकार नाही हे चित्र महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नाही.