या नामांतराबद्दल पवारसाहेब कधी बोलणार ?

Sharad Pawar - Sambhajinagar - Editorial

Shailendra Paranjapeनावात काय आहे, असं शेक्सपीअर म्हणाला पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र नावातच सारं काही आहे, असं वाटावं, अशी स्थिती आहे. औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) करावं, ही शिवसेनेची (Shiv Sena) भूमिका पूर्वीपासून आहे आणि बळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच आपल्यापुरतं ते संभाजीनगर केलंही होतं. बाळासाहेब उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव असा करायचे. मात्र, सध्या अचानक हा विषय पुन्हा नव्यानं का पुढे आलाय तर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका.

औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करण्याचा विषय पुढे येताच कॉँग्रेस (Congress) नेत्यांनी त्याला विरोध सुरू केला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी हा विरोध स्पष्ट करताना शहरांचे नाव बदलून विकास होत नाही आणि शहरांची नावं बदलण्याचा विषय तीन पक्षांच्या किमान समान कार्यक्रमात म्हणजेच कॉमन मिनिमम प्रोग्राममधे नाही, असंही सांगितलं होतं. त्यांच्या औरंगाबादमधे दिलेल्या या वक्तव्यानंतर औरंगाबादमधे थोरात यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध करण्यात आलाय. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवलाय आणि कॉँग्रेस पक्षाचा या गोष्टीला विरोध आहे, हे स्पष्ट केलंय.

दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि कॉँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरू आहे म्हणजेच हे दोन्ही पक्ष औरंगाबादच्या जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि निधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शिवसेना प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत यंनी हा प्रश्न सुटेल, अशा आशावाद व्यक्त करतानाच कॉँग्रेस नेते काही औरंगजेबाचे भक्त नाहीत, अशी टिप्पणीही केलीय. भाजपावर (BJP) टीका करताना भाजपाने पाच वर्षे काय केले, असंही त्यांनी विचारलंय.

वास्तविक, शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर पाच वर्षे सत्तेत राहिली होती. त्यामुळे त्या पाच वर्षात शिवसेनेनं नामांतराबद्दलचे आपले प्रस्ताव कधीच समोर आणले नाहीत. औरंगाबाद पालिकेत सत्ता असतानाही त्यांनी तसं काही केलेलं नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा केवळ आणि केवळ येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठीच पुढे आणण्यात आलाय, यात शंका नाही. पण या सर्व गोष्टीत सर्वाधिक जिज्ञासा आहे ती महाघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे काय भूमिका घेतात त्याची. कारण नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात पवारसाहेब गेल्या आठवड्यात नवी दिल्लीला गेले आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना भेटले. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारची आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या नेत्यांची बैठक पहिल्यांदाच सकारात्मक झाली, हा काही योगायोग नव्हे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच पुण्यात जाहीरपणे सांगितले होते की ते शरद पवार यांचे बोट धरूनच राजकारणात आलेत म्हणून.

त्यामुळे पवारसाहेबांचे बोट धरून महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांना साहेब काय सल्ला देतात, ते बघायचे. वास्तविक, पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे परस्परांचे चांगले मित्र होते आणि त्यांच्यात अनेक विषयांवर अनौपचारिक पातळीवर चर्चाही होत असे. त्यामुळे कदाचित बाळासाहेबांनाही पवारसाहेबांनी काही वर्षांपूर्वी संभाजीनगर, धाराशीव या विषयांवर काही सांगितलेलं असू शकेल. हे असं म्हणायचं कारण म्हणजे बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करण्यासाठी तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत. तसंच पवारसाहेब संभाजीनगर आणि धाराशिव मग पुढे अहमदनगरच्याही संभाव्य नामांतराबद्दल काय भूमिका घेतात, त्याची उत्सुकता आहे.

पवारसाहेबांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी सत्ता पणाला लावून भूमिका घेतली होती. पण सध्याच्या कळीचा मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणाबद्दल पवारसाहेबांनी दोन्ही छत्रपतींनी हा विषय सोडवावा असं सांगितलं होतं. आता संभाजीनगरबद्दल ते छत्रपतींकडे बोट दाखवतात की बोलण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करतात की या मुद्द्यालाच बगल देतात, हे बघायचं.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER