जितेंद्र आव्हाडांना अटक कधी होणार? – किरीट सोमय्या

Kirit Somaya

मुंबई : फेसबुकवर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला ठाण्यात मारहाण झाली होती. या प्रकरणी तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांकडून अटक केली. घटनेच्या सहा महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार? असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला आहे.

एका वाहिनीशी बोलताना सोमय्या म्हणाले – ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या १५ पोलीस अंगरक्षकांकडून इंजिनीअर अनंत करमुसेचे अपहरण केले. त्यांना घरी आणून मारहाण केली. या प्रकरणी ठाकरे सरकारने सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली! आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली; पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार? एप्रिल २०२० मध्ये मारहाण झालेल्या तरुणाची भेट घेण्यासाठी जात असताना किरीट सोमय्या यांना मुलुंड येथील त्यांचे निवासस्थान नीलम नगर येथून अटक करण्यात आली होती.

सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. ठाण्यातील इंजिनीअर अनंत करमुसे यांनी तक्रार केली आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ५ एप्रिल रोजी मला बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या वेळी आव्हाडदेखील बंगल्यात उपस्थित होते!

आव्हाड यांनी आरोप फेटाळले

जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप फेटाळले होते. माझ्या बंगल्यावर असा प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही; पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली, तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाइकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का? असे म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER