ध्यानचंद यांना कधी मिळेल ‘भारत रत्न’ चा सन्मान?

Major Dhyan chand

आणखी एक वर्ष, पुन्हा एकदा आपण त्यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय क्रीडा दिन (National sports day) साजरा करतोय, देशातील गुणवत्तावान खेळाडूंना सन्मानित करतोय, त्यांच्या नावाने पुरस्कारही देतोय पण ज्यांच्या सन्मानात, ज्यांच्या नावाने दरवर्षी हा सोहळा होतोय त्यांचाच म्हणजे हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद (Major Dhyan chand) यांचा वर्षानुवर्षे आपल्याला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारत रत्न’ (Bharat Ratna) पुरस्कारासाठी विसर पडतोय. केवढा विरोधाभास आहे हा!

खरं तर ‘दादा’ (मेजर ध्यानचंद) हे खरे भारत रत्न आहेत याबद्दल इथून तिथून सर्वांचेच एकमत आहे. वेगळे मत असणारा शोधूनही सापडणार नाही. कोट्यवधी भारतियांच्या मनावर हे रत्न कधीच बिंबले आहे. पण एक अधिकृत शासनमान्यतेची मोहर उमटायला हवी एवढीच सर्वांची इच्छा आहे आणि त्यात काही गैरसुध्दा नाही. या पुरस्काराने केवळ ध्यानचंदांचाच सन्मान वाढणार नाही तर खुद्द त्या पुरस्काराचाही सन्मान वाढणार आहे असे ‘दादांचे’ चिरंजीव अशोककुमार (Ashok Kumar) यांच्यासह असंख्य भारतियांचे मत आहे.

म्हणून डिसेंबर 2011 मध्ये जेंव्हा भारत रत्नच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करुन खेळाडूंनाही या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आले, त्यावेळी खेळाडूंमधील पहिले ‘भारत रत्न’ मेजर ध्यानचंदच ठरतील असे मानले जात होते, किंबहुना ते गृहितच धरले होते पण नोव्हेंबर 2013 मध्ये निवृत्त झालेल्या क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना फेब्रुवारी 2014 मध्ये ‘भारत रत्न’ चा सन्मान दिला गेला.

सचिन तेंडूलकरही भारत रत्न आहेच, त्याबद्दल वादच नाही पण हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि क्रिकेटच्या तुलनेत कितीतरी जास्त देशात खेळला जाणारा खेळ आहे. आॕलिम्पिक खेळ आहे आणि त्यात भारताला सलग तीन सुवर्णपदकं जिंकून देण्याची कामगिरी मेजर ध्यानचंद यांची आहे. हिटलरसारख्या हुकूमशहाची आॕफर त्याच्या तोंडावर धुडकावून लावत भारत व भारतीय विकावू नाहीत असे बाणेदार उत्तर देण्याची आणि भारत भूमीबाहेर पहिल्यांदा त्यावेळचा तिरंगा फडकावण्याची (बर्लिन आॕलिम्पिक 1936) पराकोटीची देशभक्ती मेजर ध्यानचंदांनी दाखवली होती. मैदानावरचे त्यांचे श्रेष्ठत्व तर अख्ख्या जगाने मान्य केले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठतेच्या मुद्दासुध्दा होता.असे असूनही खेळाडूंसाठीच्या पहिल्या ‘भारतरत्न’ साठी मेजर ध्यानचंदांचा विचार न होणे हे नुसते आश्चर्यजनकच नाही तर खटकणारेसुध्दा आहे. दुर्देवाने ज्यांनी याचा विचार करायला हवा त्यांना ते खटकत नाही ही शोकांतिका आहे.

युपीए सरकार असेल वा एनडीए, भारत रत्नसाठी दादांची शिफारस क्रीडा मंत्रालयाने एक -दोनदा नाही तर चार वेळा केली आहे. पण शिफारशीच्या पुढे काहीच घडलेले नाही.

2017 मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री विजय गोयल शिफारस करताना म्हणाले होते की, या पुरस्काराने मरणोत्तर त्यांचा सन्मान करणे ही खरी श्रध्दांजली ठरेल. त्यांच्या कामगिरीची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही एवढे अतुलनीय त्यांचे काम होते. त्यांना भारतरत्न दिल्याने केवळ हॉकीलाच नाही तर देशातील इतर सर्व खेळांना मोठे प्रोत्साहन मिळेल. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी अशी शिफारस करुनही अजून प्रतिक्षा कायम आहे.

2011मध्येही तब्बल 82 संसद सदस्यांनी ध्यानचंद यांना सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली होती. 2012 मध्ये पुन्हा एकदा क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या नावासोबतच अभिनव बिंद्रा व तेनझिंग नोर्गें यांचीही शिफारस केली. जुलै 2013 मध्ये पुन्हा एकदा ध्यानचंदाची शिफारस करण्यात आली.

त्यानंतर 2016 मध्येही भारताचे माजी कर्णधार अशोक कुमार, अजित पाल सिंह, झफर इकबाल, दिलीप तिर्की यांच्यासह शंभरावर खेळाडूंनी ध्यानचंद यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याबद्दल निदर्शने केली होती. आत्तासुध्दा ध्यानचंद यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, अभिनेते बाबूशान मोहंती व राचेल व्हाईट यांनी ‘भारत रत्न’ फाॕर मेजर ध्यानचंद या हॕशटॕगने डिजीटल मोहिम चालवली आहे. त्यातसुध्दा गुरुबक्षसिंग, हरविंदरसिंग, अशोक कुमार व युवराज वाल्मिकी यांनी ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे.

ध्यानचंद कुटुंबियांसाठी असे दुर्लक्ष व अन्यायाची गोष्ट नवीन नाही. एवढा महान खेळाडू, पण 1979 मध्ये जेंव्हा त्यांची प्रकृती बिघडली, तेंव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती त्यावेळीसुध्दा त्यांच्या मदतीला कुणी पुढे आले नव्हते आणि यकृताच्या कॕन्सरशी लढत लढत दिल्लीतील एम्स दवाखान्याच्या जनरल वाॕर्डात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

या अनुभवातून गेलेले ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कूमार म्हणतात की, आम्ही आता ‘दादां’साठी भारत रत्नची मागणी करणार नाही कारण त्यांना भारत रत्न न देणे ही त्यांची नाही तर या सन्मानाची मानहानी आहे. पुरस्कार हे मागायचे नसतात तर त्यासाठी लायक व्यक्तींना सन्मानाने द्यायचे असतात. आता सरकारनेच ठरवायचे आहे की ध्यान चंद हे भारत रत्नसाठी पात्र आहेत की नाही.

तुलनाच करायची झाली तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनासुध्दा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला नाही. पण म्हणून त्यांना मानणारांची संख्या कमी आहे का? कितीतरी नोबेल विजेत्यांना कुणी ओळखतसुध्दा नाही पण गांधीजींची माहिती नाही असे जगाच्या पाठीवर कुणी आहे का? त्याचप्रमाणे ध्यानचंद यांना भारतरत्न दिले नाही तर नुकसान त्यांचे नाही, तर कुणाचे आहे हे स्पष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER