मुख्यमंत्री म्हणून विठूरायाची महापूजा कधी? या प्रश्नाला अजितदादांचे भन्नाट उत्तर

Ajit pawar

पंढरपूर : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सपत्नीक कार्तिकी वारीची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांचीही उपस्थिती होती. यावेळी प्रसारमाध्यमांनी आषाढी वारीची महापूजा (Mahapuja of Vithuray)करण्याचा योग कधी येणार? अर्थात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कधी बसणार असा प्रश्न अजित पवार यांना विचारला. त्यावर ‘जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं’, असं म्हणत अजितदादांनी प्रश्न टोलवला.

असं साकडं इथे घालायचं नसतं. विरोधात असलेल्या प्रत्येकाला सरकारमध्ये राहावं असं वाटत असतं. आम्हीही काही काळ विरोधात बसलो होतो, आम्हालाही वाटायचं आपण सरकारमध्ये जावं, जनतेची कामं करावी. त्यावेळी जे सरकारमध्ये होते, ते आता विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना वाटणारच हे सरकार जावं आणि आपल्याला संधी मिळावी. या राजकीय गोष्टी चालत असतात. त्यात पांडुरंगाला मधे आणायचे कारण नाही. जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं आणि पुढे जायचं असतं, आपलं काम करायचं असतं” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

दरम्यान, करोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग करोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांची उपस्थिती होती.

ही बातमी पण वाचा : लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवार पुन्हा राजकारणात सक्रिय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER