आहार कधी घ्यावा? वेळ झाली म्हणून की भूक लागल्यावर ?

तुम्हाला वाटेल हा काय प्रश्न आहे? आयुर्वेदतज्ज्ञाकडे गेलात की एक प्रश्न नक्की विचारतात, भूक लागते का आणि भूक लागल्यावर जेवता का ? लंच टाइम झाला की जेवण, ३-४ वाजले की चहा, वडा, समोसा वगैरे, रात्री पुन्हा घरी जेवण; हे वेळापत्रक बऱ्याच जणांचे अगदी निश्चित आहे. रोबोटप्रमाणे वेळ झाली म्हणून त्या गोष्टी पार पाडणे. शरीराला गरज आहे की नाही याचा विचार न करता उदरभरण !

काही जण भूक लागली नाही तरी खातात आणि काही जण भूक लागली असेल तरीही नंतर खाऊ, एवढे काम संपवल्यावर जेवण करू, असा विचार करून क्षुधा धारण करतात. बघू या या दोन्ही गोष्टी किती घातक आहेत.

आहार कधी घ्यावा – आयुर्वेदानुसार भूक लागल्यावर आणि आधीचे खाल्लेले पचल्यावर !

घेतलेला आहार जीर्ण झाला म्हणजे आहाराचे पचन झाले का हे कसे समजावे ? त्याची लक्षणे आयुर्वेदात सांगितली आहेत.

  • जठराग्नी प्रदीप्त होणे.
  • अपानवायु अधोमार्गाने निघणे. ( गुदमार्गाने वायु निस्सरण)
  • ढेकर शुद्ध ( कडू, आंबट किंवा अन्नाचा वास नसलेली ) असणे
  • मलमूत्र शरीरातून निष्कासन होणे.
  • शरीर, पोट हलके असणे.
  • पुन्हा भूक लागणे.

अशी अनेक आहार पचन होण्याची लक्षणे सांगितली आहेत.

आता ही लक्षणे वेळेनुसार चालणारी व्यक्ती अनुभवू शकते का ? सर्व जण खातात म्हणून खाणे हे चुकीचे आहे. आधी घेतलेला आहार न पचताच पुन्हा खाण्याने अजीर्ण, स्थौल्य, अतिसार अम्लपित्त अशा कितीतरी व्याधींची मुहूर्तमेढ आपण करत जातो. परंतु अगदी साधा नियम की, भुकेची जाणीव होऊ देणे. योग्य पोषण मिळावे, शरीर पुष्ट व्हावे याकरिता आवश्यक आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूक लागली असतानाही न खाणे!

आयुर्वेदात १३ प्रकारचे शरीराचे नैसगिक वेग कधीच थांबवू नये असे सांगितले आहेत. मलमूत्र वेग असो किंवा भूक-तहान असो. त्यामुळे शरीरात स्थायी विकृती निर्माण होतात व व्याधी होतात. क्षुधा ( भूक) वेग धारण केल्याने कोणते व्याधी होतात याचे वर्णन आचार्यांनी केले आहे. कृशता, दुर्बलता, अंग वेदना, अरुचि, चक्कर येणे इत्यादी. भूक लागल्यावर जेवण न केल्याने पाचकाग्नी शरीर धातूचा पाक करते. रक्ताल्पता (अनेमिया), परिश्रम न करताही थकवा जाणवणे अशी लक्षणं जाणवतात. त्यामुळे क्षुधावेग धारण हेसुद्धा चुकीचे आहे.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER