..जेंव्हा तीन शतायुषी क्रिकेटपटू एकाच सामन्यात खेळले!

Cricket

क्रिकेटपटूंनी मैदानावर शतकं झळकावणे ही तशी कॉमन गोष्ट पण आयुष्याच्या खेळपट्टीवरही शतकं झळकावणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच. आणि असे शतायुषी आयुष्य लाभलेले क्रिकेटपटू एकाच सामन्यात खेळलेले असतील तर तो सामना खासच म्हणायला हवा.

तो खास सामना कोणता, हे तर बघूच पण त्याआधी त्यात खेळलेले शतायुषी खेळाडू कोणते त्याची माहिती घेऊ या…तर हे दीर्घायू क्रिकेटपटू म्हणजे प्रा. दी. ब. देवधर (D.B.Deodhar) , वसंत रायजी (Vasant Raiji) आणि रघुनाथ चांदोरकर (Raghunath Chandorkar) ! यापैकी रघुनाश चांदोरकर यांनी आपल्या आयुष्याचे शतक शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी पूर्ण केले. तर प्रो. देवधर यांची आयुष्याची खेळी 1892 ते 1993 आणि वसंत रायजी यांची खेळी 1920 ते 2020 अशी राहिली. नाबाद खेळी खेळत असलेल्या रघुनाथ चांदोरकरांनी 1943-44 ते 1946-47 दरम्यान महाराष्ट्रासाठी आणि 1950-51 मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.

तर विलक्षण योगाचा भाग असा की भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हे तिन्ही शतायुषी क्रिकेटपटू योगायोगाने एका सामन्यात सोबत खेळले होते. डिसेंबर 1944 मध्ये पुण्यात खेळला गेलेला महाराष्ट्र विरुध्द बडोदा असा तो सामना होता आणि त्यात वसंत रायजी हे बडोद्याकडून तर प्रो. देवधर व चांदोरकर हे महाराष्ट्राकडून खेळले होते. बडोद्याने तो सामना 354 धावांनी जिंकला होता पण पुढे जाऊन आयुष्याचे शतक पूर्ण केलेले तीन खेळाडू एकाच सामन्यात खेळले असा हा क्रिकेट इतिहासातील बहुधा एकमेव सामना असावा.

101 वर्ष 222 दिवस आयुष्य लाभलेले प्रो. देवधर 81 प्रथम श्रेणी सामने खेळले. वसंत रायजी 100 वर्ष 139 दिवस जगले. ते केवळ 9 प्रथम श्रेणी सामने खेळले तर रघुनाथ चांदोरकर यांनी शनिवारीच शतक पूर्ण केले. ते फक्त सातच प्रथम श्रेणी सामने खेळले पण एवढ्या कमी सामन्यात खेळुनही या तिघांच्या एकत्र खेळण्याने हा अद्वितीय विक्रम घडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER