व्हेन देअर इज विल, देअर इज वे…

Shailendra Paranjapeकरोना (Corona) संकटाचा मुकाबला करण्यासाठी जगभरातून भारताला मदतीचे हात दिले जात आहेत आणि जागतिक आरोगय संघटनेनेही (WHO) भारतातल्या करोना स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत शक्य ती सर्व मदत करू असंही जाहीर केलं आहे. भारतीय संरक्षण दलंही आता करोना संकटाच्या मुकाबल्यामधे उतरताहेत आणि लष्करी रुग्णालयांसह लष्करी वैद्यकीय सेवेतून निवृत्त झालेले डॉक्टर्स, नर्सेस यांसह लष्करी विमानसेवेचा प्राणवायू वाहतुकीचा वापर अशा विविध पातळ्यांवर करोनासारख्या युद्धजन्य स्थितीचा मुकाबला केला जातोय.

अनेक राज्यात करोना वाढत चालल्याचं चित्र दिसू लागलंय आणि त्याला कारण असं आहे की महाराष्ट्र तुलनेनं प्रागतिक असल्यानं करोना असो की एड्स रोगाला कारणीभूत ठरणारा एचआयव्ही हा विषाणू, महाराष्ट्रात चाचण्या कायमच जास्ती प्रमाणात केल्या जातात आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर अर्बन किंना नागरी शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा जास्ती चाचण्या केल्या जातात. करोना हा रोग आणि विषाणू जगभरातल्या संशोधकांनाही अजून पूर्ण समजल्याचा दावा केला जात नाहीये. त्यामुळे अशा वेळी पूर्वकाळजी हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाययोना ठरतोय आणि त्यामुळेच शहरी किंवा समाजाच्या काहीशा उच्चउत्पन्न गटांमधे गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेत करोनाचा संसर्ग खूप प्रमाणात दिसून आला नव्हता. त्यामुळे यंदा दुसऱ्या लाटेत शहरी आणि तेही मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्गात करोनाचा संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्यावर त्याबद्दल फिअर सायकोसिस पसरावं तशा पद्धतीची भीती पसरली आहे.

तंत्रज्ञानाच्या परिणामस्वरूप मोबाईलच्या आहारी जाण्यानं सकाळी सकाळी उघडलं व्हाट्स अँप की कुणी तरी ओळखीचं करोनानं गेल्याचं समजतं, अशी चिंतावजा तक्रार पुण्यातले हतबल शहरी लोक करू लागलेत. त्या तुलनेत गोरगरीबांच्या वस्त्यांमधे करोनाचा फैलाव दुसऱ्या लटेत खूप मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. पण या वर्गामधे लॉकडाऊन सॉरी कडक निर्बंधांमुळे हातावरचे पोट असलेल्यांचे चेहरे सुकून गेले आहेत. अक्षरशः आला दिवस ढकलला जात आहे. या वर्गाला सरकारनं दिलासा द्यायला हवा आणि त्यासाठी कोणीही कोणत्याही पातळीवर न्यायालयात जाण्याची गरज न येता लोकांचे हाल दूर व्हावेत.

पुण्यातली परिस्थिती गेल्या आठ दिवसात सातत्याने सुधारतेय. नव्या करोनाग्रस्तांपेक्षा बरे होणाऱ्यंचे प्रमाण वाढतेय आणि मृत्यूदरही हळूहळू अटोक्यात येईल, असं चित्र आहे. त्यात एक तारखेपासून लशीकरण आणखी वाढेल पण त्यासाठी लशींचा पुरवठा मात्र वाढण्याची गरज आहे आणि लशीकरणाचा टक्का वाढला की आपोआप सामूहिक प्रतिकारशक्तीही वाढेल आणि किमान करोनानं प्राण जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व नागरिकांनी एकत्रितपणे मनात आणलं तर रेमडिसिव्हर, प्राणवायू नीटपणे उपलब्ध होईल. लशीही सर्वांना मिळू शकतील आणि करोना हा आजवरचा सर्वात वेगळा विषाणू असला तरी विषाणू आणि रोग किंवा साथ यापेक्षाही जीवन मोठं असतं, हेच आपण सारे सिद्ध करू या.

जाता जाता…

या सर्व वातावरणात नागपूरच्या नारायणराव दाभाडकर (Narayanrao Dabhadkar) या ८५ वर्षांच्या आजोबांनी संपूर्ण समाजासमोर खूप मोठा आदर्श ठेवलाय आणि करोनावर सर्वार्थाने मात करता येते, हे करोनानं आलेला मृत्यू स्वीकारत सिद्ध केलंय. नागपूरच्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करून दोनच तास झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात बेडची गरज एका तुलनेनं तरुण रुग्णाला आहे, हे लक्षात घेऊन बेड रिकामा केला आणि माझं जगणं सुफळ झालंय, असं सांगत स्वतः लेखी संमती देऊन रुग्णालयातून घरी गेले. उपचारांची गरज असताना तुम्हाला कसं सोडणार, या डॉक्टरांच्या प्रश्नालाही त्यांनी मी स्वेच्छेने घरी जातोय कारण दुसऱ्या रुग्णाला गरज आहे हे निक्षून सांगितले. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दाभाडकर आजोबांना मृत्यू आला. त्यांच्या घरात इतरही सदस्यांना करोना संसर्ग होता पण जगण्याचा खरा अर्थ भोगात नाही तर त्यागात आहे, हे तत्त्वज्ञान उच्चरवाने सांगत समाजकारणाच्या नावाने निव्वळ राजकरण करणाऱ्या आणि करोनामुळं आणखी आत्मकेंद्री झालेल्या समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले दाभाडकर आजोबा तत्त्वज्ञान सांगायचं नसतं तर आचरणात आणायचं असतं, हा करोनावर विजय मिळवणारा धडा देऊन गेले आहेत. चिरंजीव झाले आहेत.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button