
सॅम करन (Sam Curran) …इंग्लंडचा (England). डावखुरा अष्टपैलू खेळाडू. भारताविरुध्दच्या तिसऱ्या वन डे सामन्यातील त्याच्या 83 चेंडूतील नाबाद 95 धावांच्या झुंझार खेळीने तो चर्चेत आहे. सॅमची ही खेळी निःसंशय सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे पण भारताला त्याच्या अशा दमदार खेळाचा हा काही पहिलाच अनुभव नाही.
आपला दुसराच कसोटी सामना खेळताना त्याने भारताविरुध्द 2018 च्या बर्मिंगहॕम कसोटीत त्याने 24 व 63 धावा केल्या आणि पहिल्या डावातील चार विकेटसह सामन्यात एकूण 5 विकेट काढल्या होत्या. अवघ्या 20 वर्षे वयात आणि आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात तो सामनावीर ठरला होता. यानंतर साउथम्पटन कसोटीतही त्याने 78 व 46 धावांच्या खेळी केल्या. याप्रकारे पदार्पणातच त्याने फलंदाजी असो की गोलंदाजी, कमी वयातच आपली उपयुक्तता सिध्द केली.
*प्रथम श्रेणीत कमी वयात चमकदार पदार्पण
अर्थात सरे (Surrey) या आपल्या काउंटी संघासाठी 2015 मध्ये तो पदार्पणातच चमकला होता. वयाच्या 17 व्या वर्षीच त्या सामन्यात त्याने केंटविरुध्द पहिल्या डावात पाच आणि सामन्यात आठ बळी मिळवले होते. काउंटी चॕम्पियनशीपमध्ये सर्वात कमी वयात डावात पाच बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
17 वर्ष 40 दिवस वयात तो सरेसाठी खेळलेला दुसरा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता. यानंतर जून 2018 मध्ये त्याने पाकिस्तानविरुध्द कसोटी पदार्पण केले तेंव्हासुध्दा त्याने वयाची विशीसुध्दा (19 वर्ष 363 दिवस) गाठलेली नव्हती.
*अष्टपैलू वडिलांचा वारसा
सॅमसाठी क्रिकेट हे त्याच्या रक्तातच आहे कारण त्याचे वडील केव्हिन करन (Kevin Curran) हेसुध्दा उत्तम क्रिकेटपटू होते जे झिम्बाब्वेसाठी खेळले होते. केव्हिन करन हे भारतीय क्रिकेट रसिकांच्या अजुनही आठवणीत असतील कारण 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत ज्या सामन्यात कपिल देव (Kapil Dev) यांनी 175 धावांची ती ऐतिहासिक खेळी केली होती त्या सामन्यात करन यांनी श्रीकांत, संदीप पाटील व मदनलाल यांना बाद केले होते. यानंतर त्याच सामन्यात त्यांनी 73 धावांची खेळीसुध्दा केली होती.
सॅमचा मोठा भाऊ टाॕम करन (Tom Curran) हासुध्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. सरेसाठी पदार्पणात टाॕमसोबतच त्याने गोलंदाजीची सुरुवात केली आणि आपल्या पाचव्याच चेंडूवर त्याने जो डेन्ली याला बाद केले. आज टाॕम व सॅम ही दोन्ही भावंडे इंग्लंडच्या संघात आहेत आणि आयपीएलही खेळताहेत.
*अतिशय खडतर प्रवास
करन भावंडाचे वडील हे झिम्बाब्वेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याने त्यांचा प्रवास सहज व सुखद असेल असे वाटत असेल तर प्रत्यक्षात ते तसे नाही. अतिशय वाईट परिस्थितीतून ही भावंड पुढे आली आहेत पण दुर्देवाने त्यांचे हे यश पाहण्यासाठी त्यांचे हे वडील हयात नाहीत. केव्हिन करन यांचे 2012 मध्येच निधन झाले.
*झिम्बाब्वेतील राजकीय वादळाने झाले होते बेघर
त्याच्याआधी करन कुटुंबावर झिम्बाब्वेतील राजकीय परिस्थितीमुळे पहाड कोसळला.2005 मध्ये राॕबर्ट मुगाबे राजवटीने देशातील गोऱ्या शेतकऱ्यांना देश सोडून जाण्याचे फर्मान काढले. त्यामुळे केव्हिन यांनासुध्दा झिम्बाब्वे सोडावे लागले. सुदैवाने ते क्रिकेटपटू असल्याने त्यांना मुगाबे राजवटीने एक महिन्याचा कालावधी तरी दिला. पण ज्या शेतात केव्हिनच्या आईच्या अस्थी विसर्जीत केलेल्या होत्या ते शेत, तेथील घर असे सर्व सोडून करन कुटुंबाला झिम्बाब्वेच्या बाहेर पडावे लागले.
*जेफ मार्श व अॕलन लॕम्ब यांची मदत
त्या काळात दोन मित्र केव्हिनच्या मदतीला धावून आले. एक म्हणजे जेफ मार्श (Geoff Marsh) आणि दुसरे म्हणजे अॕलन लॕम्ब (Allen Lamb) . आॕस्ट्रेलियाचे सफल फलंदाज राहिलेले जेफ मार्श हे त्यावेळी झिम्बाब्वे च्या संघाचे प्रशिक्षक होते आणि केव्हिन त्यांचे सहायक होते. त्या संकटाच्या वेळी जेफ मार्श यांनी सॅम व टाॕमसह केव्हिन करन यांच्या कुटुंबाला आपल्या घरी आसरा दिला.सॅम आणि टॉम करनची मिचेल मार्श व शाॕन मार्श यांच्याशी असलेल्या दोस्तीचे मूळ या पार्श्वभूमीत आहे.
अॕलन लॕम्ब व केव्हिन करन हे इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये नार्दम्पनशायर या एकाच काउंटीसाठी खेळायचे आणि तिथे केव्हिन खूप लोकप्रिय होते. त्याच काळापासून लॕम्ब व करन यांची दोस्ती होती. त्या आठवणी आठवत अॕलन लॕम्ब सांगतात, ‘मी केव्हिनला नेहमीच सांगायचो की मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तू इंग्लंडला ये पण तो काही मानायचा नाही. पत्नी सारासोबत घटस्फोट झाल्यानंतरही तो झिम्बाब्वेच्या बाहेर पडला नाही. मुलांमध्ये त्याचा फार जीव होता. तेच त्याच्यासाठी सर्वकाही होते. सॅम चारेक वर्षांचा असेल तेंव्हाचा एक व्हिडिओ मला अजूनही आठवतो. केव्हिन या मुलांना गोलंदाजी करायचा आणि ते तासनतास खेळायचे. अगदी साध्या मातीच्या तात्पुरत्या खेळपट्टीवर खेळायचे. त्याचवेळी वाटत होते की, ही मुले पुढे जाऊन खासच बनतील”. आणि आज ही मुले खरोखरच खास बनले आहेत.
*नार्दम्पटनशायरची दोस्ती
नार्दम्प्टनशायरसाठी केव्हिन खेळायचा तेंव्हा सॅम व टाॕम हे मैदानाच्या बाजूला खेळत रहायचे. त्या आठवणीत रमताना लॕम्ब सांगतो, “मी केव्हिनला नेहमीच म्हणायचो की तुझी मुले तर तुझ्यापेक्षाही चांगले आहेत आणि ते खूप पुढे जातील. मला आनंद आहे की हे शब्द खरे ठरले आहेत.”
अॕलन लॕम्ब यांनी टाॕम व सॅमसाठी ‘गॉडफादर’ची भूमिका पार पाडली आहे. 2012 मध्ये केव्हिनचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यावेळी क्रिकेट जगत त्यांच्या मदतीला धावून आले. टॉम इंग्लंडमध्ये आला तर सॅम, बेन,आणि त्यांची आई सारा हे झिम्बाब्वेमध्येच राहिले. त्यावेळी जेफ मार्श यांनी करन कुटुंबाला रहायला छत दिले.
*लॕम्ब यांनी केली शिक्षणाचीही व्यवस्था
लॕम्ब आग्रह करत राहिले की साराने सॅम व बेनलासुध्दा इंग्लंडमध्ये पाठवावे आणि साराचा आग्रह होता की तिघांचेही शिक्षण एकाच ठिकाणी व्हावे. लॕम्ब यांनी तशी व्यवस्था केली आणि तिन्ही करन बंधूंना वेलिंग्टन काॕलेजात प्रवेश घेतला. काॕलेजनेही त्यांनी शिष्यवृत्तीच्या रुपात अर्थसहाय्य केले, आणि येथून टाॕमपाठोपाठ सॅमचाही स्पर्धात्मक क्रिकेटचा प्रवास सुरु झाला आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर तो लवकरच नावारुपाला आला.
*सॅम आधी फलंदाज- नंतर गोलंदाज
सॅमकडे अष्टपैलू म्हणून बघितले जात असले तरी तो आधी फलंदाज आहे..नंतर गोलंदाज.चांगली गोलंदाजी करु शकणारा उत्तम फलंदाज असे त्याचे वर्णन करणे योग्य ठरेल असे अॕलन लॕम्ब यांनी सॅमबद्दल म्हटलेय आणि पुण्यातील तिसऱ्या सामन्यांतला त्याचा खेळ पाहता आणि आतापर्यंतची त्याची कारकिर्द पाहता हे सॅमसाठी तंतोतंत लागू पडतेय. लॕम्ब सांगतात की सॅम हा त्याच्या वडीलांसारखाच जिगरबाज आणि निश्चयी आहे. टॉमला त्याच्या आधी इंग्लंडच्या संघात स्थान मिळाले तेंव्हा हा जिद्दीला पेटला आणि मलासुध्दा टॉमसोबत इंग्लंडच्या संघात खेळायचेय अशी त्याची महत्वाकांक्षा जागृत झाली. आज टाॕम जून 2017 पासून 2 कसोटी, 25 वन डे आणि 27 टी-20 सामने खेळला आहे तर सॅम जून 2018 पासून 21 कसोटी आणि 8 वन डे सामने खेळला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला