
सचिन तेंडूलकरने आपल्या वन डे सामन्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक 62 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. दुसऱ्या स्थानावरील सनथ जयसूर्यापेक्षा सचिन तब्बल 14 अधिक वेळा सामनावीर ठरला आहे.
आता सचिन सामनावीर ठरला म्हणजे फलंदाजीतील चांगल्या कामगिरीनेच ठरला असणार असे वाटणे साहजिक आहे पण दोन वेळा असे झालेय की सचिनने सामनाविराचा किताब फलंदाजीसाठी नाही तर गोलंदाजीसाठी पटकावलाय.
यापैकी दुसरा आणि शेवटचा गोलंदाजीसाठीचा किताब सचिनने पटकावला तो आजचाच दिवस होता. 1 एप्रिल 1998 रोजी कोची येथे आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात त्याने ही कामगिरी करताना 32 धावात 5 बळी मिळवले होते आणि फलंदाजीतील आपले अपयश भरुन काढले होते. फलंदाजीत त्याने फक्त आठ धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने आॕस्ट्रेलियाचे बेव्हन, स्टिव्ह वॉ, डेमियन मार्टीन, टॉम मुडी आणि डॕरेन लेहमनला बाद केले होते आणि भारताने 41 धावांनी हा सामना जिंकला होता.
त्याआधी सचिन गोलंदाजीसाठी सामनावीर ठरला होता तो 22 आॕक्टोबर 1991 रोजी शारजा येथे. वेस्ट इंडिजवर सात गडी राखून मिळवलेल्या विजयात त्याने 34 धावात 4 बळी मिळवले होते.