जेव्हा रणबीर कपूरने गोविंदाची जाहीर माफी मागितली होती

Katrina Kaif - Govinda - Ranbir Kapoor

बॉलिवुडमध्ये (Bollywood) अनेक कलाकारांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद होत असतात. परंतु एकाच क्षेत्रात काम करायचे असल्याने लवकरात लवकर वाद मिटवण्याचा प्रयत्न कलाकारांकडून केला जातो. त्यामुळेच जे कधी काळी एकमेकांचे तोंडही न पाहाण्याचा निर्णय घेतात ते कलाकार पुन्हा एकत्र आलेले दिसतात. काही कलाकार मात्र मनस्वी असतात त्यामुळे अपमान करणाऱ्याने माफी मागितली तरी ते अपमान विसरत नाहीत. गोविंदा (Govinda) आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेकमधील वाद तर सगळ्यांच्याच लक्षात आहे. असाच काहीसा वाद जग्गा जासूस सिनेमाच्या वेळेस गोविंदा आणि अनुराग बसुमध्ये झाला होता. या वादावर पडदा टाकण्यासाठी सिनेमाचा एक निर्माता असलेल्या रणबीर कपूरने गोविंदाची जाहीर माफी मागितली होती. रणबीरने माफी मागितली खरी पण त्या दोघांमध्ये पॅचअप झाले की नाही ते अजूनही कळलेले नाही.

काही वर्षांपूर्वी अनुराग बसुने (Anurag Basu) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि कॅटरीना कैफला (Katrina Kaif) घेऊन जग्गा जासूस सिनेमाला सुरुवात केली होती. या सिनेमातील एका भूमिकेसाठी गोविंदालाही साईन करण्यात आले होते. गोविंदाने काही सीन्सचे शूटिंगही केले होते. मात्र एडिटिंगमध्ये गोविंदाची सगळे सीन काढून टाकण्यात आल्याने गोविंदा नाराज झाला होता. गोविंदाने त्याची नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. गोविंदाने म्हटले होते, मी एका अभिनेत्याच्या नात्याने काम केले होते. परंतु दिग्दर्शक माझ्या कामाने खुश नव्हता. अर्थात हा त्याचा निर्णय होता. सिनेमाला तीन वर्ष उशिर झाला याचे खापर माझ्यावर फोडण्यात येत होते. मात्र माझी तब्येत ठीक नसतानाही मी सलाईन लावून दक्षिण आफ्रिकेत शूटिंगसाठी गेलो होतो आणि शूटिंग पूर्ण केले होते. सिनेमाचे कथानक साउथ आफ्रिकेत सांगण्यात येईल असे मला सांगण्यात आले होते. मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन साउथ आफ्रिकेला गेलो होतो. मी कोणतेही काँट्रॅक्ट केले नव्हते आणि सायनिंग अमाउंटही घेतली नव्हती. कपूर कुटुंबाबत माझ्या मनात आदर असल्याने मी कपूर कुटुंबाला सन्मान दिला. हा सिनेमा मी केवळ रणबीर कपूरसाठी केला होता असेही गोविंदाने म्हटले होते.

गोविंदाच्या आरोपांवर उत्तर देताना अनुराग बसुने म्हटले की, ‘जग्गा जासूस’चे शूटिंग डिले होत होते. गोविंदा शूटिंगला येईल की नाही याबाबत शंका होती. गोविंदा विमान पकडून साऊथ आफ्रिकेला येईल की नाही असा प्रश्न उद्भवत होता. शूटिंगची सगळी तयारी झालेली होती. काय करावे ते समजत नव्हते. शूटिंग सुरु असल्यानेच आम्ही गोविंदाचे सीन कापून टाकले असे म्हटले होते.

सिनेमाचा निर्माता असलेल्या रणबीर कपूरने मात्र चूक मान्य करीत गोविंदाची माफी मागितली होती. रणबीरने म्हटले होते. ही माझी आणि दिग्दर्शक अनुराग बसुची चूक होती. स्क्रिप्ट तयार नसतानाही आम्ही शूटिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही अनेक कॅरेक्टर बदलले. त्यामुळे सिनेमा तयार होण्यासही वेळ लागला. गोविंदासारख्या मोठ्या कलाकाराला साईन केल्यानंतर त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय देणे आवश्यक होते. परंतु तसा न्याय न देणे ही मोठी चूक होती. यासाठी मी गोविंदाची माफी मागतो असेही त्याने म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER