जेव्हा शाहरुखच्या कानाखाली वाजवायची होती जया बच्चन यांना

Jaya Bachchan-Shah Rukh Khan.jpg

बॉलिवुडमधील ड्रग्जच्या वापराचा विषय सध्या ऐरणीवर आहे. कंगना रनौतने याला वाचा फोडली, त्यानंतर उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) त्यात उडी मारली आणि आता जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी संसदेत या विषयावर बोलताना काही कलाकारांना उद्देशून बोलताना ज्या ताटात खातात त्यातच छेद करतात असे म्हटले आणि त्यामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. भाजप खासदार रवि किशनसह (Ravi Kishan) अनेकांनी जया बच्चन यांना या वक्तव्यावरून घेरले आहे. यावर कंगनाने उत्तर देताना, तुमची मुलगी श्वेता माझ्या जागी असती तरीही तुम्ही हेच म्हणाला असता का असा प्रश्न करीत, जर अभिषेक बच्चनलाही अशा गुंडगिरीचा सामना करावा लागला असता आणि एखाद्या दिवशी फाशी घेतली असती तरीही तुम्ही असे म्हणत आमच्याप्रती सहानुभूती व्यक्त कराल का असा प्रश्न केला. रवि किशनने तर म्हटले की, मी जया बच्चन यांचा आदर करतो आणि संसदेत त्यांच्या पायाही पडतो. पण जया बच्चन यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी माझे वक्तव्य ऐकले नाही. खरे तर सगळ्यांनी मिळून बॉलिवुड वाचवले पाहिजे. देशातील तरुणांना ड्रग्जपासून वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असेही रवि किशनने मह्टले होते. अर्थात जया बच्चन यांची वाद ओढवून घेण्याची किंवा असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशी अनेक वक्तव्ये करून वाद निर्माण केला होता.

2008 मध्ये कॅटरीना कैफने आपल्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ऐश्वर्या राय बच्चनवर एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरून शाहरुख आणि सलमानमध्ये चांगलाच वाद झाला होता. अभिषेक, अमिताभ आणि जया बच्चन यांना ही घटना कळली तेव्हा खूप राग आला होता. परंतु अभिषेक आणि अमिताभ गप्प बसले होते. त्यानंतर एका मुलाखतीत जया बच्चन यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी, याबाबत माझे शाहरुखशी बोलणे झाले नाही. पण मी तेथे असते तर शाहरुखच्या कानाखाली आवाज काढला असता असे वक्तव्य केले. यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. त्यानंतर अभिषेक बच्चनच्या द्रोण चित्रपटाच्या प्रीमियरला जेव्हा शाहरुख आला तेव्हा जया बच्चन उठून निघून गेल्या होत्या. शाहरुखवरचा त्यांचा राग अजूनही कमी झालेला नाही.

एवढेच नव्हे तर आपल्या मुलाच्या एका चित्रपटाला त्यांनी जाहीरपणे बकवास म्हटले होते. अभिषेक बच्चनला काम मिळत नसताना फरहा खानने शाहरुख खान निर्मिती आणि अभिनीत हॅप्पी न्यू इयरमध्ये महत्वाची भूमिका दिली होती.या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, यात माझा मुलगा अभिषेक असल्याने मी हा चित्रपट पाहिला. परंतु  हा अत्यंत बकवास चित्रपट आहे. पण माझा मुलगा एक चांगला अभिनेता आहे म्हणूनच कॅमेऱ्यासमोर तो इतके फालतू काम करू शकला अशी उपरोधिक टीका करायलाही त्या विसरल्या नव्हत्या.  त्यामुळे फरहा व शाहरुख जया बच्चन यांच्यावर नाराज झाले आणि त्यानंतर त्यांनी बच्चन कुटुंबियांसोबत अजूनपर्यंत काम केलेले नाही. अमिताभ बच्चन यांनी मात्र चित्रपटाने 300 कोटींचा व्यवसाय केल्यानिमित्त फरहा, शाहरुख आणि हॅप्पी न्यू इयरच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या.

अमिताभ बच्चनबरोबरच्या नात्याबाबत बोलताना जया बच्चन यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, तो मला सोडून जाईल आणि माझ्यावर रागावेल म्हणून मी त्याला घाबरून असते असे वक्तव्य केले होते. त्यावेळी अमिताभ आणि रेखाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोरात होती. मुलाखतीत जया बच्चनने  रेखा अमिताभच्या प्रेमप्रकरणाबाबत विचारले असता हे अत्यंत घृणास्पद असून असा प्रश्न तुम्ही कसा विचारू शकता असे म्हटले होते. त्यावरूनही चांगलाच गदारोळ झाला होता.

अभिषेक बच्चनला सुपरहीरो बनवणाऱ्या द्रोणा चित्रपटाच्या कॅसेट रिलीज प्रसंगीही जया बच्चन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कॅसेट रिलीजचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण बॉलिवुड तेथे उपस्थित होते. त्यावेळी मंचावरून बोलताना जया बच्चन यांनी मी उत्तर प्रदेशची असल्याने हिंदीतच बोलणार असे म्हटले. त्यानंतर मनसेने जया बच्चन यांच्या विरोधात मोहिम सुरु केली. तेव्हा जया बच्चन यांना माफी मागावी लागली होती. अर्थात यासाठी अमिताभ बच्चन यांनीच तिला गळ घातली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER