अयोध्येत गेल्यावर पाहूयात शिवसेनेने तिथे किती कामे केली आहेत; मनसेचा शिवसेनेला टोला

विश्व हिंदु परिषदेच्या नेत्यांनी कृष्णकुंजवर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

Raj Thackeray - Sanjay Raut

मुंबई : प्रत्येक हिंदूने अयोध्येत जायला हवं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील रामाला मानतात म्हणून तेही जातात. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांना वाटतं की, शिवसेनेनं (Shiv Sena) कामं केली आहेत, पाहूया तिथे गेल्यावर काय कामं केली आहेत ती, असं म्हणत नांदगावकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

या दौऱ्याच्या  पार्श्वभूमीवर आज विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. राज टाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आम्ही त्यांना हवी ती मदत करू. त्यांच्या स्वागतासाठीची सर्व तयारी करायची आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते कोकण प्रांत सहसचिव मोहन सलेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही राम मंदिर निर्माण निधी संकलनाची मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत आम्ही विविध मान्यवरांना भेटून त्यांना कार्यक्रमाची माहिती देत आहोत. याच अंतर्गत आम्ही राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो.

आम्ही त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमासाठी मदत स्वतः अयोध्येला जाऊन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना त्यांच्या अयोध्या भेटीसाठी आमच्याकडून कुठलीही मदत लागल्यास ती आम्ही करू. त्यांच्या स्वागताच्या दृष्टीने जे काही नियोजन आणि तयारी करायची आहे त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत, असंही सलेकर यांनी सांगितले.

तर, या भेटीवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितले की, सगळेच राज ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी मदत करायला तयार आहेत, मोहन भागवत यांच्यासोबतही त्यांचं नातं चांगलं आहे. राज ठाकरे यांचा १ ते ९ दरम्यान अयोध्या दौरा आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहे, असे नांदगावकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER