जेव्हा कलाकारांचे खोटे नातेवाईक येतात समोर

बॉलिवुड कलाकारांचे (Bollywood actors) आयुष्य विविध चमत्कृत घटनांनी भरलेले असते. सिनेमात जशा घटना घडतात तशाच घटना अनेकदा काही कलाकारांच्या जीवनातही घडलेल्या दिसतात. अनेकदा सिनेमात आपण पाहतो की, एखाद्या श्रीमंत माणसाचा वारस लहानपणीच कुठे तरी गेलेला असतो. आणि मग कोणीतरी तोतया त्याचा नातेवाईक बनून त्याची संपत्ती हडपण्यासाठी येतो. मात्र लवकरच त्याचे बिंग फुटते आणि खरा वारस समोर येतो. काही कलाकारांच्या जीवनातही अशा घटना घडलेल्या आहेत. आज आपण अशाच काही घटनांवर नजर टाकूया-

बॉलिवू़डमध्ये विश्व सुंदरी ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai Bachchan) लोकप्रियता आता जरी कमी झालेली दिसत असली तरी एके काळी ऐश्वर्याची लोकप्रियता प्रचंड होती. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. ऐश्वर्या राय आपली आई असल्याचा दावा आंध्र प्रदेशमध्ये राहाणाऱ्या एका संगीत कुमार नावाच्या तरुणाने करून खळबळ माजवली होती. तीन वर्षांपूर्वी या तरुणाने दावा केला होता की, ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी 1988 मध्ये आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याला लंडनमध्ये जन्म दिला होता. त्याच्या जन्मानंतर दोन वर्ष तो ऐश्वर्याच्या आई-वडिलांसोबतच राहात होता असा दावाही त्याने केला होता. त्याच्या या दाव्यावरून प्रचंड खळबळ माजली होती. परंतु नंतर चौकशीत त्याचे सगळे दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले. ऐश्वर्यावर खोटे आरोप केल्याप्रकरणी नंतर या तरुणाला पोलिसांनी अटकही केली होती.

ऐश्वर्या आई असल्याचा दावा जसा एका तरुणाने केला होता तसाच अभिषेक बच्चनची (Abhisek Bachchan) पत्नी असल्याचा दावाही एका मॉडेल तरुणीने करून खळबळ माजवली होती. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने लग्न ठरल्यानंतर जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडेल असलेल्या तरुणीने अभिषेकची पत्नी असल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे तर जान्हवीने अभिषेकच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर अमिताभच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर हाताची नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. जान्हवीचे म्हणणे होते की, ‘दस’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी तिच्यात आणि अभिषेकमध्ये जवळीक निर्माण झाली आणि अभिषेकने काही मित्रांच्या उपस्थितीत तिच्याशी लग्न केले. अभिषेक तिचा पति असून ती अभिषेकचे ऐश्वर्यासोबत लग्न होताना पाहू शकत नाही. पोलिसांनी जान्हवी कपूरलाही अटक केली होती.

असाच काहीसा प्रकार शाहीद कपूरसोबतही (Shahid Kapoor) घडला होता. वास्तविकता पंडित हे नाव तुम्हाला आज कदाचित आठवणार नाही. बॉलिवूडमधील संवादाचा बादशाह मानला जाणारा अभिनेता राजकुमार मात्र तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. तर ही वास्तविकता याच राजकुमार यांची मुलगी. वास्तविकताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला पण तिला यश काही मिळाले नाही. शाहीद कपूर पति असल्याचा दावा करीत वास्तविकताने चांगलीच खळबळ माजवली होती. शाहीद कपूरला पति मानून वास्तविकता त्याच्या पाठोपाठ सगळीकडे जात असे. त्याला ती रस्त्यात अडवतही असे. या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागल्याने अखेर शाहीदने पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी वास्तविकताला बोलावून समज दिली. त्यानंतर मात्र वास्तविकता कुठे आहे त्याचा काहीही पत्ता नाही.

एकीकडे खोटे पती, पत्नी आणि मुलगा समोर येत असतानाच एका कलाकाराच्या जीवनात तर चक्क खोटे आई-बापच आले होते. खोट्या आई-बापांनी मुलगा असल्याचा दावा केलेला हा अभिनेता आहे देशातील सुपरस्टार रजनीकांतचा (Rajanikant) अभिनेता जावई धनुष. (Dhanush) धनुष मुलगा असल्याचा दावा एका दांपत्याने केला होता. धनुष लहानपणी घर सोडून पळून गेला होता. आता आम्ही म्हातारे झाले आहोत त्यामुळे मुलाने आम्हाला दर महिन्याला 65 हजार रुपये खर्चासाठी द्यावेत अशी मागणीही या दांपत्याने केली होती. धनुषने या प्रकरणार पोलीस तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरु करून धनुषची डीएनए टेस्टही केली होती. त्यानंतर या दांपत्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले होते.

धनुषचे खोटे आईवडील आणि ऐश्वर्या रायचा खोटा मुलगा जसा समोर आला तसाच प्रकार प्रख्यात गायिका अनुराध पौडवाल (Anuradha Paudwal) यांच्याबाबतही घडला होता. अनुराध पौडवाल आई असल्याचा दावा एका महिलेने करून खळबळ माजवली होती. तिरुअनंतपुरममध्ये जन्मलेल्या 45 वर्षीय करमला मोदेकस नावाच्या महिलेने केरळ जिल्हा कोर्टात अनुराध पौडवाल यांच्या विरोधात खटला दाखल करून 50 कोटी रुपयांची मागणी केली होती. करमलाचे म्हणणे होते, अनुराधाने जन्म दिल्यानंतर चारच दिवसानंतर तिला दुसऱ्यांच्या हाती सोपवले होते. तिच्या वडिलांनीच तिला सांगितले की, अनुराधा पौडवाली तिची आई आहे असेही करमलाने म्हटले होते. करमलाचे वडील पोन्नाचन सैन्यात होते आणि त्यांचे पोस्टिंग महाराष्ट्रात झाले होते. त्याचवेळी त्यांची अनुराधा पौडवालसोबत ओळख झाली होती. अनुराधाने त्यांच्याकडे तिची एक मुलगी सोपवली. आणि ती मुलगी म्हणजेच मी असेही करमलाने म्हटले होते. परंतु हे प्रकरणही खोटे निघाले आणि अनुराध पौडवाल यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER