आदल्या सामन्यात कर्णधार, पुढच्या सामन्यात संघाबाहेर

Maharashtra Today

सनरायझर्स हैदराबादने (SRH) पराभवांची मालिका खंडीत करण्यासाठी कर्णधार बदलला, एवढेच नाही तर अपयशी कर्णधाराचा (Captain) शिक्का मारुन बाजूला केलेला डेव्हिड वाॕर्नर (David Warner) याला संघातही स्थान दिले नाही पण सनरायझर्सचा पराभवाचा फेरा काही चुकला नाही. राजस्थान राॕयल्सकडून रविवारी त्यांना 55 धावांनी हार पत्करावी लागली. नवा कर्णधार केन विल्यम्सन (Ken Williamson) 95.23 च्या कमी स्ट्राईक रेटने 20 धावा काढून बाद झाला. पण आदल्या सामन्यात कर्णधार असलेला डेव्हिड वाॕर्नर या सामन्यासाठी संघातसुध्दा नव्हता. पुढील सामन्यांमध्येही वाॕर्नरला संधी मिळेल अशी शक्यता कमीच आहे.

आयपीएलमध्ये (IPL) असे पहिल्यांदाच घडले आहे का? तर नाही…यापूर्वीही असे घडले आहे आणि अगदी रिकी पोंटींगसारख्या विश्वविजेत्या कर्णधारासोबत घडले आहे.अर्थात पोंटींगला कुणी वगळले नव्हते तर त्याने स्वतःहून संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला होता. 2013 च्या आयपीएलच्या वेळची गोष्ट आहे. त्यावेळी पोंटींगने मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली होती आणि पुढच्या सामन्यात तो संघाबाहेर बसला होता. योगायोगाने तो निर्णय यशस्वी ठरला होता आणि मुंबईने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर पोंटींग पुन्हा आयपीएलचा सामना खेळला नाही. तो मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक बनला. 2016 पर्यंत तो मुंबईसोबत होता. त्यानंतर महेला जयवर्धने मुंबईचा प्रशिक्षक बनला आणि पोंटींग दिल्ली कॕपिटल्सकडे आला.

गौतम गंभीरने तर आपल्या नेतृत्वात दोन वेळा कोलकाता नाईट रायडर्सकडे आयपीएलची ट्रॉफी आणली. त्यानंतर तो दिल्ली कॕपिटल्सकडे आला. पण 2018 च्या आयपीएलमध्ये दिल्लीची कामगिरी अतिशय खराब झाली. सहा सामन्यात ते फक्त एकच सामना जिंकू शकले. त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडून दिले आणि पुन्हा तो खेळलाच नाही. त्यावर्षी डिसेंबरमध्येच त्याने निवृत्ती जाहीर केली.

स्टिव्ह स्मिथसोबत राजस्थान राॕयल्समध्ये असेच घडले. त्याला एकाच सामन्यासाठी बाहेर बसवण्यात आले आणि पुन्हा तो संघात कर्णधार म्हणूनच परतला. 2019 च्या मोसमात तो राजस्थान राॕयल्सकडे परतला तेंव्हा तो माजी कर्णधार होताच. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द त्याला वगळण्यात आले पण पुढच्याच सामन्यात तो राॕयल्सचा कर्णधार होता. त्यानंतर गेल्यावर्षीही स्मिथच त्यांचा कर्णधार होता पण यंदाच्या सिझनसाठी राजस्थान राॕयल्सने त्याला रिलीज केले आणि संजू सॕमसनकडे नेतृत्व सोपवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button