जेव्हा धाकटे चमकले थोरल्यांपेक्षा !

  • क्रिकेटपटू भावंडांची कहाणी
  • कृणाल अपवाद ठरणार का?

गेल्या काही वर्षांत जे भारतीय खेळाडू सतत चर्चेत असतात ते म्हणजे पांड्या बंधू. कृणाल आणि हार्दिक (Krunal Pandya and Hardik Pandya) ! मैदानावरील कामगिरी असो की मैदानाबाहेर. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. कृणाल पांड्याचे झंझावाती अर्धशतकासह विश्वविक्रमी वन डे पदार्पण (ODI debut) हेसुद्धा याला अपवाद नव्हते.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात कृणालने पदार्पणात सर्वांत वेगवान अर्धशतक (२६ चेंडू) झळकावण्याचा विश्वविक्रम केला हा विक्रम तर आता सर्वांनाच माहीत  झालाय; पण किती लोकांना हे ठाऊक आहे की पांड्या बंधूंमध्ये कृणाल थोरला आहे आणि हार्दिक धाकटा (Brothers) …पण हार्दिक हा आपल्या मोठ्या भावाच्या आधी वन डे इंटरनॅशनल खेळलाय आणि मंगळवारी त्याने म्हणजे धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाला (कृणाल) पदार्पणाची मानाची कॕप दिली. असे अगदी क्वचितच घडते की धाकट्या भावाच्या हातून मोठ्याला पदार्पणाची कॕप मिळते आणि मोठ्या भावाच्या आधी धाकटा भाऊ आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला असतो. कृणालची जन्मतारीख आहे २४ मार्च १९९१…म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे.

आणि हार्दिकची जन्मतारीख आहे ११ नोव्हेंबर १९९३. म्हणजे कृणाल हा हार्दिकपेक्षा जवळपास अडीच वर्षांनी मोठा आहे; पण हार्दिक आतापर्यंत ५८ वन डे, ४८ टी-२० आणि ११ कसोटी सामने खेळलाय. तर कृणाल अद्याप कसोटी सामना खेळलेला नाही, टी-२० इंटरनॅशनल १८ खेळलाय तर वन डेत त्याने पदार्पण साजरे केले. म्हणजे धाकट्या पांड्या थोरल्या पांड्याच्या बराच पुढे आहे; पण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे घडलेल्या भावंडांत पांड्या हे काही एकमेव नाहीत. याच्याआधी अमरनाथ बंधू (सुरिंदर व मोहिंदर), पठाण बंधू (इरफान व युसूफ) यांच्याबाबतही असेच घडलेय.

सुरिंदर अमरनाथ हे जिमी अमरनाथपेक्षा पावणेदोन वर्षे  मोठे; पण मोहिंदर (जिमी) खेळले ६९ कसोटी व ८५ वन डे तर सुरिंदर खेळले फक्त १० कसोटी आणि तीन वन डे. आणि जिमी कसोटी खेळल्यानंतर तब्बल सात  वर्षांनी सुरिंदर कसोटी खेळले तर वन डे सामनाही तीन वर्षांनंतर खेळले. पठाण भावंडांमध्येही युसूफ पठाण हा इरफानपेक्षा दोन वर्षांनी मोठा; पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट आधी खेळला इरफान. इरफान २९ कसोटी, १२० वन डे आणि २४ टी-२० सामने खेळला.

युसूफला कसोटी सामना खेळायलाच मिळाला नाही आणि वन डेचे ५७ व टी-२० चे २२ आंतरराष्ट्रीय सामने तो खेळला. या प्रकारे या तिन्ही उदाहरणांमध्ये धाकटा भाऊ हा थोरल्यापेक्षा लवकर खेळलाय आणि यशस्वीसुद्धा ठरलाय. कृणाल हा याला अपवाद ठरेल काय? याचसंदर्भात भारतीय महिला क्रिकेटचा विचार केला तर एदुलजी भगिनी (डायना व बेहरोज) यांनी सोबतच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. यात बेहरोज थोरली आणि एदुलजी धाकटी. मात्र यातही धाकटी खेळाडू म्हणून कितीतरी चमकली तर बेहरोज फक्त एकच सामना खेळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER