जेंव्हा मोठ्या भावाने धाकट्याला लगावले लागोपाठ सहा षटकार

Dwayne and Kemar Smith

भाऊ असला म्हणून काय झालं, मैदानावर तर आहे प्रतिस्पर्धी, असे म्हणत ड्वेन स्मिथने (Dwayne Smith) त्याचा भाऊ केमार स्मिथ (Kemar Smith) याच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. केमारच्या एकाच षटकात त्याने तब्बल सहा षटकार लगावले. ब्रिजटाऊन क्लब क्लॕश (Bridgetown Club Clash) स्पर्धेत सोमवारी भाऊ विरुध्द भाऊ अशी ही झुंज बघायला मिळाली. ब्रिजटाऊन जवळच्या इडन लॉज येथे हा सामना झाला.,

37 वर्षीय ड्वेन स्मीथ याने वेस्ट इंडिजसाठी कसोटी पदार्पणात फक्त 93 चेंडूतच दक्षिण आफ्रिकेविरुध्द शतक केले होते. याशिवाय आयपीएल व चॕम्पियन्स लीग विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचाही तो सदस्य होता. विव्ह रिचर्डस यांनी त्याच्या खेळात आपली झलक असल्याचे म्हणत कौतुक केले होते. तर अशा या ड्वेन स्मीथने सीआरबी संघाविरुध्द एरोल होल्डर स्टार्स संघासाठी सलामीला खेळताना ही तुफान फटकेबाजी केली. स्थानिक टेन 10 स्पर्धेचा हा अंतिम सामना होता.

त्यात पहिले षटक सीआरबी संघाकडून केमार स्मिथ याने टाकले. केमार स्मिथला वडील बंधू ड्वेन एवढा अनुभव नसला तरी त्याला इंग्लंडमधील प्रोफेशनल क्रिकेटचा अनुभव आहे आणि एक चांगला आॕफस्पिनर म्हणून कॕरेबियन क्रिकेटमध्ये त्याची ओळख आहे. तर अंतिम सामन्यातले पहिले षटक केमारने टाकले आणि समोर फलंदाज होता त्याचा वडील बंधू ड्वेन. आणि ड्वेनने आपल्या एरोल होल्डर स्टार संघाच्या विजयाचेच लक्ष्य समोर ठेवले आणि समोरचा गोलंदाज हा आपला धाकटा भाऊ आहे हे विसरुन दणादण षटकार लगावला. एक, दोन नाही तर तब्बल सहाच्या सहा चेंडूंना त्याने षटकारासाठी भिरकावले. याप्रकारे ड्वेन स्मिथने सामन्याच्या पहिल्याच षटकात आपलाच भाऊ केमारच्या गोलंदाजीवर 36 धावा वसूल केल्या. या खेळीत ड्वेन 46 धावा करून बाद झाला.

केमारसाठी जखमेवर मीठ म्हणजे नंतर जेंव्हा तो फलंदाजीला आला तेंव्हा ड्वेनने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. भोपळासुध्दा फोडू दिला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER