जेव्हा बॉलिवूड कलाकार स्कॅममध्ये फसतात

When Bollywood actors fall into scams.jpg

बॉलिवूड कलाकार (Bollywood actors) जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्यावर लोकं लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळेच अनेक कंपन्या या कलाकारांना आपला ब्रॅन्ड अँम्बेसेडर (Brand Ambassador) बनवतात. कलाकारांनी एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली की त्या उत्पादनाचा खप वाढतो आणि कंपनीला फायदा होतो. त्यामुळेच कंपन्या मोठी रक्कम देऊन कलाकारांना ब्रॅन्ड अँम्बेसेडर बनवतात. कलाकारही पैसे मिळत असल्याने काही जाहिराती स्वीकारतात परंतु त्या कंपन्या जनतेला फसवतात, पैसा गोळा करतात आणि पळून जातात. कलाकार मात्र त्यामुळे स्कॅममध्ये (scams) फसतात आणि खटल्यांना सामोरे जातात.

शाहरुख खान अशा दोन प्रकरणात आतापर्यंत अडकला आहे. कलकत्त्यातील रोझव्हॅली चिटफंड घोटाळ्यात त्याचे आणि जूही चावलाचे नाव आले होते. शाहरुख आणि जुही मालक असलेल्या केकेआर टीमशी रोझव्हॅलीने एक करार केला होता. केकेआरच्या खेळाडूंच्या कपड्यांवर रोझव्हॅलीचा लोगो वापरला जाणार होता. यासाठी शाहरुखला कोट्यावधीची रक्कम मोजण्यात आली होती. रोझव्हॅली ग्रुपच्या रिसॉर्टची जाहिरात शाहरुख करीत होता. या कंपनीने अनेकांना फसवल्याचे उघड झाले होते.

यासोबतच वेबवर्क ट्रेड लिंक्सच्या ऑनलाईन पाँजी स्कॅममध्ये शाहरुख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव आले होते. या कंपनीने 500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. शाहरुख आणि नवाजुद्दीनने वेबवर्क ट्रेड लिंक्सच्या एका वेबसाइटला प्रमोट केेले होते. या कंपनीचे मालक अनुराग जैन आणि संदेश वर्मा लोकांना शाहरुख आणि नवाजुद्दीन आपले ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असल्याचे सांगून पैस उकळत होते. पोलिसांनी शाहरुख आणि नवाजची चौकशी करून त्यांना सोडले होते.

अशाच प्रकारचा घोटाळा हैदराबादच्या क्यूनेट कंपनीने केला होता. कंपनीने एक मल्टीलेव्हल मार्केटिंग योजना सुरु करून लोकांना ज्यादा व्याजाची लालूच दाखवून पैसे गुंतवण्यास सांगितले होते. लोकांना पैसे न मिळाल्याने त्यांनी पोलीस तक्रार केली. त्यानंतर सायबराबाद पोलिसांनी 38 गुन्हे दाखल करून 70 जणांना अटक केले होते. या प्रकरणात पोलिसांनी अनिल कपूर, बोमन ईरानी, जॅकी श्रॉफ, शाहरुख खान, विवेक ओबेरॉय, पूजा हेगडे यांनी कंपनीच्या एका कार्यक्रमात भाग घेतलेला असल्याने पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. फायनांशियल फ्रॉड्स व्हिक्टिम्स वेलफेअर असोसिएशनने केलेल्या दाव्यानुसार डायरेक्ट सेलिंग आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून या कंपनीने 20 हजार कोटी रुपये भारताबाहेर पाठवले आहेत.

अभिनेत्री मिनिषा लांबा तर यूएईतील प्रॉपर्टी स्कॅममध्ये फसली होती. एका कंपनीने मिनिषाला ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बनवले आणि यूएईत स्टॅलियन प्रॉपर्टीजची सुुरुवात केली. मिनिषा लांबा तुमची शेजारी असेल असे सांगून या कंपनीने अनेकांना घरे विकली होती. परंतु हा प्रोजेक्ट पूर्ण झालाच नाही. कंपनीने 20 लाख 45 हजार डॉलर कमवले होते. पोलिसांनी तक्रार आल्यानंतर याची चौकशी सुरु केली आणि तीन जणांना अटक केली. याप्रकरणी मीनिषा लांबाचीही चौकशी झाली होती.

प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या रायही नकली कंपनीच्या नोंदणीत फसले होते. जगप्रसिद्ध झालेल्या पनामा पेपर्स लीकमध्ये अनेकांची नावे आली होती. परदेशात नकली कंपन्यांची नोंद करून त्या कंपन्यांच्या नावावर पैसे पाठवून कर वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा घोटाळा पनामा पेपरमधून उघड झाला होता. यात अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचेही नाव होते. आयकर विभागाने या दोघांची कसून चौकशी केली होती. या दोघांनीही फसवले असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण खूपच गाजले होते.

सध्या रितेश देशमुखची पत्नी असलेल्या जेनिलिया डिसूझाचेही अशाच घोटाळ्यात नाव आले होते. मिस अंजनीपुत्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.ने जेनेलियाला आपला ब्रॅन्ड अँम्बेसेडर बनवले होते. जेनेलियाने कंपनीसोबत मिळून अनेकांना फसवल्याचे सांगितले जात होते. या कंपनीने जवळ जवळ 500 बोगस प्ल़ॉट विकल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच 2012 मध्ये जेनेलियाविरोधात अरेस्ट वॉरंटही जारी करण्यात आले होते. तिच्या 250 कोटी रुपयांच्या स्कॅमचा आरोप होता. हैदराबाद पोलिसांनी जेनेलियावर 120(b) (षड्यंत्र रचणे), 420 (फसवणूक करणे), 406 (विश्वासघात) आणि 506 (धमकी देणे) ही कलमे लावून गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणातही पुढे काही झाले

प्रख्यात नृत्य आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझानेही एका चित्रपटासाठी गाझियाबादच्या सत्येंद्र त्यागीकडून पाच कोटी रुपये घेतले होते. चित्रपट रिलीज झाल्यावर दुप्पट रक्कम देऊ असे त्याने सांगितले होते. मात्र पैसे परत केले नाहीत. एवढेच नव्हे तर रेमोने अंडरवर्ल्डची धमकी दिल्याचा आरोपही सत्येंद्रने केला होता. गाझियाबाद न्यायालयाने रेमोला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. नंतर हे प्रकरण मिटवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER