बाळांना दात येतांना …

लहान बाळ सहा सात महिन्यांचे झाले की हिरड्या कडक होण्यास सुरवात होते. मुलांपेक्षा मुलींचे दात लवकर येतात व त्यांना त्रासही कमी होतात असे काश्यप संहितेत वर्णित आहे. लहान बाळ दिसेल त्या वस्तू तोंडात टाकण्यास सुरु करतात. तसेच या दरम्यान लाळ गळण्याचे प्रमाण वाढते. दात निघतांना वेगवेगळे त्रास बाळांना होतांना दिसतात. याला आयुर्वेदात दन्तोद्भेद गद असे म्हटले आहे.

दंत निघतांना अनेक प्रकारचे आजार बाळांना होतात त्या आजारांचे मूळ कारण दात येणे हे असते. साधारणपणे ताप अतिसार चिडचिड सर्दी खोकला डोळ्यांना त्रास होणे असे विविध त्रास या काळात बाळांना होतात. आचार्य वाग्भट म्हणतात, “दन्तोद्भेदे च बालानां न हि किञ्चिन्न दूयते ।” बालकांना दात निघतांना शरीरातील कोणताच असा अवयव नाही ज्याला त्रास पिडा होत नाही. म्हणूनच लक्षणे तीव्र असतील तर त्यानुसार लगेच काळजी घ्यावी लागते. दात आल्यावर हे त्रास कमीदेखील होतात. दात निघतांना बाळांच्या आहारात बदल करण्याची विशेष आवश्यकता पडत नाही.

दात निघण्यास विलंब होत असेल तर मध लावणे, पिंपळी मध घेऊन बोटाने हलकेपणाने मालीश करणे फायदेशीर ठरते. डिकेमालीचा वापर या वेळी फायदेशीर ठरतो. वारंवार दिसेल त्या वस्तू तोंडात टाकण्याची सवयीमुळे लवकर इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते म्हणून प्लास्टीक खेळणी टोकदार वस्तू समोर ठेवू नये. बाळाच्या हातात मोठा गाजराचा तुकडा देणे जास्त संयुक्तिक आहे. बालगुटीमधे हिरडा सुंठ डिकेमालीचा वापर करता येतो. पोट साफ राहण्यास मदत होते. आव असेल पोटदुखी पोट फुगले असेल तर मुरडशेंग मायफळ बाळहिरडा गुटीत देता येते.

मुख्य म्हणजे या दात येण्याच्या काळात बाळांना ताजा नरम पातळ आहार, आईचे दूध सुरु ठेवावे. बिस्किट ब्रेड चॉकलेट पॅकेट फूड हे पचविणे शक्य नाही. अशा आहाराने पाचन बिघडून दात येतांनाची लक्षणे अजूनच वाढतात. आयुर्वेद (Ayurveda) संहितांमधे दंत उद्भव काळजी त्यावेळी होणाऱ्या त्रासाची चिकित्सा, त्यादरम्यान आईची बाळाची काळजी वर्णित आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER