जेव्हा आनंद बक्षींनी अमिताभला पहिल्यांदा म्हणायला लावले गाणे

प्रख्यात अभिनेता अमिताभ बच्चनने (Amitabh Bachchan) अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. काही चित्रपटांमध्ये अमिताभच्या आवाजात सुदेश भोसलेने (Sudesh Bhosale) गाणी गायली आहेत. परंतु ती अमिताभच्याच नावावर खपवली गेली आहेत. स्वतः अमिताभही सुदेशच्या आवाजावर प्रचंड खूश आहे. काही जाहिरातींमध्येही सुदेशने अमिताभचा आवाज काढला आहे. परंतु अमिताभने चित्रपटात पहिले गाणे कसे आणि का गायले याची रोचक कथा आहे.

१७७-७८ मध्ये टिटो टोनी यांनी अमिताभला घेऊन ‘मि. नटवरलाल’ चित्रपट तयार करण्याची योजना आखली. फार कमी वाचकांना ठाऊक असेल की, या चित्रपटाच्या सेंसॉर बोर्ड प्रमाणपत्रावर अमिताभ बच्चन इन अँड मि. नटवरलाल असे मोठे नाव आहे. या नावाच्याही दोन कथा आहेत. चित्रपट तयार झाला तेव्हा ‘नटवरलाल’ नाव एका निर्मात्याने रजिस्टर्ड केल्याचे समजले आणि त्या निर्मात्याने रजिस्टर्ड केलेले नाव देण्यास नकार दिला. त्यातच खऱ्या नटवरलालनेही त्याच्या नावावर चित्रपट तयार करण्यास ऑब्जेक्शन घेतल्याने नावात असा बदल करावा लागला होता.

खरे तर टिटो टोनी अमिताभ आणि धर्मेंद्रला घेऊन ‘राम बलराम’ची तयार करीत होते. मात्र धर्मेंद्रकडे डेट्स नसल्याने त्याने दोन महिन्यांनंतरची वेळ दिली होती. दोन महिने हाताशी असल्याने निर्मात्यांनी ‘राम बलराम’ सुरू करण्यापूर्वी नटवरलालच्या निर्मितीची योजना आखली. दिग्दर्शक राकेश कुमार, संगीतकार राजेश रोशन, कलाकार अमिताभ, रेखा, अमजद खान; परंतु हातात कथा-पटकथा नाही. असे असतानाही काश्मीरमध्ये शूटिंगचे शेड्यूलही तयार केले. काश्मीरमध्ये गाणी आणि काही दृश्ये चित्रित करण्याचा निर्णय घेतला. परंतु गाणीही हाताशी नव्हती. गाण्यासाठी राजेश रोशन, टोनी आणि राकेश कुमार हे आनंद बक्षी यांच्याकडे पोहचले. परंतु तीन आठवड्यांत सहा गाणी देणे शक्य नसल्याचे सांगत आनंद बक्षी (Anand Bakshi) यांनी त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. परंतु एकत्र नव्हे तर जसजशी तयार होतील तशी गाणी द्या, असे सांगितल्यावर आनंद बक्षी तयार झाले.

एक दिवस आनंद बक्षी पान चघळत राजेश रोशनच्या घरी गेले. तेथे टोनीही आला होता. गप्पा मारता मारता आनंद बक्षी एक गाणे गुणगुणायला लागले. गाण्याचे बोल होते, परदेसिया सच हैं पिया, सब कहते हैं तुने मेरा दिल ले लिया. सगळ्यांना हे बोल आवडले आणि ते मीटरमध्ये गात असल्याने चांगले वाटत होते. आनंद बक्षींनी १५ मिनिटांत गाणे लिहिले आणि मीटर तयार असल्याने राजेश रोशन यांनी १५ मिनिटांत संगीत देऊन अर्ध्या तासात गाणे तयार झाले. या गाण्यानंतर गाण्यांवर चर्चा करताना लहान मुलांबरोबर एखादे गाणे असावे असा विचार सगळ्यांच्या मनात आला.

तेव्हा आनंद बक्षी यांनी जर नायक मुलांसोबत गाणे गात असेल तर गायकाकडून गाणे गाऊन घेण्याऐवजी आपण नायकाकडूनच गाणे गाऊन घेऊ. अमिताभ नायक असल्याने त्यालाच हे गाणे गायला लावू. आनंद बक्षींची ही कल्पना सगळ्यांनाच आवडली. त्यानंतर एकाच सीटिंगमध्ये आनंद बक्षी यांनी ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो…’ हे गाणे लिहून काढले. अमिताभने यापूर्वी ‘कभी कभी’ चित्रपटात काही ओळी गायल्या होत्या. परंतु गाणे असे कधीही गायले नव्हते. अमिताभने सुरुवातीला गाणे म्हणण्यास नकार दिला. आपला आवाज गाण्यासाठी योग्य नाही.

आपण गायकांकडूनच हे गाणे गाऊ असे त्याने स्पष्टपणे सांगितले. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार सुरू झाला. आनंद बक्षी, राजेश रोशन यांनी अमिताभला समजावले. त्याच्याकडून काही दिवस रिहर्सल करून घेतली आणि महबूब स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड झाले. गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर साउंड रिकॉर्डिस्ट घोष बाबू यांनी अमिताभला सांगितले की, तुझा आवाज गाण्यासाठी चांगला आहे, तू गात जा. यानंतर अमिताभने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER