अलका कुबल चिडतात तेव्हा….

Alka Kubal

आजच्या तरुण मुलींना नेमकं झालंय तरी काय ? नम्रता , मोठ्यां विषयी आदर या गोष्टी तर लांबच पण चुकीचे पडणारे पाऊल थांबवणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना या मुली साधी ओळखही दाखवत नाहीत. आज त्यापैकी काहीजणी प्रसिध्द अभिनेत्री आहेत पण एक वेळ अशी होती जेव्हा त्या अनैतिक विळख्यात सापडणार होत्या. त्याची जाणीव करून दिल्यानंतर त्यांचे पाऊल योग्य दिशेने पडले, मात्र याची जाणीव या मुलींना नाही. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केलेल्या या भावना आहेत. सध्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांचा वाद इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आहे. पण अलका कुबल यांनी ही गोष्ट प्राजक्ता विषयी नव्हे तर एका अशा.

यशस्वी अभिनेत्री विषयी सांगितली आहे, जी सध्या मराठी सिनेमा इंडस्ट्री मधली सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री तिच्या अगदी उमेदवारीच्या काळात कास्टिंग काऊच प्रकरणात अडकत होती. अलका कुबल यांनी तिला व तिच्या आईला वास्तवाची जाणीव करून दिली आणि त्यामुळे त्या अभिनेत्रीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. नुकतीच त्या अभिनेत्रीची भेट होण्याचा एक प्रसंग आला तेव्हा त्या अभिनेत्रीने अलका कुबल यांना ओळख दाखवली नाही असं सांगत अलका कुबल यांनी आत्ताच्या सेलिब्रेटी मुलींविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

“आई माझी काळुबाई” या मालिकेची नायिका प्राजक्ता गायकवाड आणि या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांचा सध्या वाद सुरू आहे. यानिमित्ताने दोघींकडूनही एकमेकींवर वेगवेगळे आरोप होत आहेत. याच विषयाच्या अनुषंगाने अलका कुबल यांनी सध्या मराठी सिनेमा, मालिका, इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या तरुण मुलींच्या ॲटीट्युड बद्दल त्यांचं मत व्यक्त केलं.

याच निमित्ताने एक आठवण सांगताना अलका कुबल म्हणाल्या, मी जव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा सिनेमा आणि नाटक ही दोन माध्यमच होती. यामध्येसुद्धा आपल्याला चांगली भूमिका मिळावी यासाठी खूप कष्ट घ्यावे लागायचे. खूप संयम ठेवावा लागायचा. आता मालिका, वेगवेगळे शोज, रियालिटी शोज अशा माध्यमातून खूप पर्याय आहेत. ऑफर वाढल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये तरुण अभिनेत्री मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी पंधरा-सोळा वर्षांच्या मुलींना देखील मालिकांच्या निमित्ताने चांगले रोल मिळत आहेत आणि मालिका घराघरांमध्ये पाहिल्या जात असल्यामुळे प्रसिद्धीचे वलय देखील लगेच या मुलींना मिळते. याची कुठेतरी हवा आजकालच्या मुलींच्या डोक्यात जाते.

मला आठवतंय, मी एक सिनेमा करत होते आणि त्या सिनेमा मध्ये एक छोटासा रोल करण्यासाठी 16 ते 17 वर्षाची एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. ती मुलगी अत्यंत देखणी होती. शिवाय तिला नृत्यकौशल्यही चांगले येत होते. त्याच वेळी तिची आई मला म्हणाली की, तिला एक चांगली ऑफर आली आहे आहे आणि त्या निर्मात्याने तिला एका हॉटेलवर भेटायला बोलावले आहे. त्या दोघी खरंतर तयारही झाल्या होत्या या गोष्टीसाठी. मात्र त्याच दरम्यान इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच हे प्रकरण गाजत होतं. यामध्ये चांगल्या मुलींची निर्मात्यांकडून पिळवणूक केली जात होती. कुठेतरी हॉटेलमध्ये भेटायला बोलावून त्यांच्या वर अतिप्रसंग केले जात होते. याला अनेक मुली त्या काळामध्ये बळी पडल्या होत्या. त्यामुळे जेव्हा तिच्या आईने मला या विषयी सांगितले तेव्हा मी त्या मुलीच्या आईला सांगितले की, असं काही करु नका. ही मुलगी दिसायला खूप छान आहे. तिला डान्स चांगला येतो .

अभिनय चांगला आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मी माझ्या अनुभवावरून सांगते. मला ही दोन मुली आहेत. माझं मुलीच्या आईने ऐकलं आणि त्यांनी ते काम न करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काही दिवसांमध्ये त्या निर्मात्या विषयी एका मुलीने तक्रार केली आणि ते पितळ उघडं पडलं. तेव्हा मला खूप आनंद झाला की आपण एका मुलीचं आयुष्य वाचवू शकलो. त्यानंतर ती मुलगी आज इंडस्ट्री मध्ये चांगलं नाव कमावत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काम करत आहे. काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तीच अभिनेत्री आणि माझी भेट झाली. तिच्यासोबत तिची आईदेखील होती. आईने येऊन माझे आभार मानले. आपण ज्या मुलीसाठी पोटतिडकीने काही सल्ला दिला होता ती यशस्वी झालेली बघून मला खूप छान वाटले. पण उमेदवारीच्या त्या काळामध्ये एका भूमिकेसाठी निर्मात्याच्या आमिषांना बळी पडणाऱ्या त्या मुलीने माझ्याकडे येऊन बोलण्याचे सुद्धा सौजन्य दाखवले नाही. ह्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला.

गेल्या चाळीस वर्षापासून अलका कुबल या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करताहेत. महिलाप्रधान सिनेमाची सुरुवात अलका कुबल यांनीच केली. अलका कुबल यांच्या नावावर सिनेमा गाजायचा. आज निर्मात्याच्या भूमिकेमध्ये देखील चांगल्या कलाकृती प्रेक्षकांना देत आहेत. प्राजक्ता गायकवाड सोबत झालेल्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून अलका कुबल या देखील चर्चेत आहेत. आजची तरुणाई अभिनयामध्ये नक्कीच चांगली आहे. मात्र झटपट मिळणारी लोकप्रियता जर पचवता येणार नसेल तर त्या अभिनयालादेखील काही अर्थ येत नाही असं देखील स्पष्ट मत अलका कुबल व्यक्त करतात.

अलका कुबल यांच्यावर देखील एक असा प्रसंग आला होता. त्या वेळेला त्या नवीन होत्या. एका निर्मात्याने त्यांना एका सिनेमात काम करण्यासाठी बोलावलं तेव्हा त्यांना देखील काही तडजोडी करा असे आमिष दाखवले होते. परंतु त्यांनी ठामपणे त्या प्रोजेक्टला नकार दिला होता. आपल्याकडे जर चांगली गुणवत्ता असेल, अभिनयक्षमता असेल तर आपण कुठल्याही गोष्टीला बळी न पडता त्याबदल्यात कुठलीही अयोग्य गोष्ट करण्यासाठी ठामपणे नकार देता आला पाहिजे. हे जर आजच्या काळातल्या अभिनेत्री होण्यासाठी धडपडणारा मुलींनी लक्षात ठेवलं तर त्यांना या क्षेत्रांमध्ये टिकून राहण्यासाठी कशा पद्धतीने मेहनत करावी लागते याचं महत्त्व कळेल असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER