चहल हा जडेजासाठी ‘लाईक टू लाईक’ रिप्लेसमेंट होता का?

wheather Chahal is like to like replacement for Jadeja

भारत (India) आणि आॕस्ट्रेलियादरम्यानच्या (Australia) पहिल्या टी-20 सामन्यात (T-20 match) निर्णायक भूमिका बजावलेल्या युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) काॕन्क्युजन सबस्टिट्यूशनबद्दल (Concussion Substitute) चर्चा का आहे? मिशेल स्टार्कचा (Mitchell Starc) चेंडू रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) हेल्मेटवर आदळल्यावर नियमानुसारच चहलला काॕन्क्युजन सबस्टिट्यूट’ म्हणून खेळवण्यात आले, मग त्याच्या खेळण्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? आॕस्ट्रेलियाने सामना जिंकला असता तर अशी चर्चा झाली असती का? तीन महत्त्वाचे बळी मिळवून सामनावीर ठरलेला चहल अपयशी ठरला असता तरीसुध्दा अशीच मतेमतांतरे उमटली असती का, याबद्दल शंकाच आहे पण भारताचे सुदैव आणि आॕस्ट्रेलियाचे दुर्देव, दुसरे काय!

तर चहलला खेळवण्याच्या मागे जी मतेमतांतरे उमटली आहेत त्यामागची कारणे म्हणजे…

1) जडेजाच्या जागी चहल ही लाईक टू लाईक रिप्लेसमेंट होती का?

2) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जडेजाला मार बसल्यानंतर मैदानातच त्याच्यावर प्रथमोपचार व तपासणी का केली नाही?

यात सर्वात आधी हे स्पष्ट करायला पहिजे की वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाआधारे काॕन्क्युजन सबस्टिट्यूटची विनंती मान्य करायची की नाही? बदली खेळाडूची सामन्यातील पुढील खेळात नेमकी काय भूमिका राहिल? हे ठरविण्याचे अधिकार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सामनाधिकाऱ्यांना (Match referee) दिले आहेत. भारताने सामनाधिकारी डेव्हिड बून यांना विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. नशिब की डेव्हिड बून हे आॕस्ट्रेलियाचेच आहेत नाहीतर भारताची बाजू घेण्याचा आरोप झाला असता.

सारे काही नियमानुसारच झाले पण ज्याला कुणालाही क्रिकेट समजते तो सहज सांगू शकतो की रविंद्र जडेजासाठी युझवेंद्र चहल ही काही ‘लाईक टू लाईक’ रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. कारण जडेजा हा खरं तर अष्टपैलू आहे. मोझेस हेन्रीकनेसुध्दा हाच मुद्दा मांडला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जडेजा फलंदाजीत चहलपेक्षा उजवा आहे आणि रिस्ट स्पिनर व फिंगर स्पिनर असा फरकसुध्दा आहेच. मग डेव्हिड बून यांनी ही रिप्लेसमेंट मान्य कशी केली?

याठिकाणी सामनाधिकाऱ्यांना असलेले अधिकार महत्त्वाचे ठरले. आता जी काही माहिती समोर येतेय त्यानुसार फिरकी गोलंदाज म्हणून बून यांनी हा बदल मान्य केला होता. त्यांनी चहल व जडेजा या दोघांकडे केवळ गोलंदाजीचा विषय असल्याने फिरकी गोलंदाज म्हणून बघितले. पण त्यांची गोलंदाजीची शैली भिन्न आहे याकडे मात्र दुर्लक्षच झाले.

दुसरा मुद्दा म्हणजे जडेजाला अष्टपैलू मानले तर त्याची जागा घेऊ शकणारा लाईक टू लाईक आॕलराऊंडर रिप्लेसमेंट भारताकडे नव्हताच. अशा स्थितीत पर्यायी खेळाडू उपलब्ध नसेल तर सामनाधिकारी काॕन्क्युजन सबस्टिट्यूट’ नाकारु शकतात पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खेळाडूची स्थिती खराब आहे, तो खेळू शकणार नसल्याचा अहवाल दिला तर सामनाधिकाऱ्यांना हा पर्याय वापरताच येत नाही. त्यामुळे उपलब्ध पर्यायामधूनच योग्य पर्याय निवडायचा असतो, जो चहलच्या बाबतीत बून यांनी केला.

आणखी एक मुद्दा चर्चेत आलाय की विसाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाला मार बसल्यानंतर फिजियो नितीन पटेल हे लगेच प्रथमोपचार व तपासणीसाठी मैदानात धावलेच नाहीत. काॕन्क्युजन सबस्टिट्यूटबाबत आयसीसीच्या नियमावलीच्या हे विरोधात असल्याचे माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे. मार बसल्यानंतरही सावरल्यावर जडेजाने फलंदाजी करताना तीन चेंडूत आणखी नऊ धावा केल्या आणि ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर आपल्याला चक्रावल्यासारखे होत असल्याची तक्रार केली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीसुध्दा तो पुढे खेळू शकणार नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर भारतीय संघव्यवस्थापनाने काॕन्क्युजन सबस्टिट्यूटची मागणी केली.

आता यात मुद्दा हा आहे की, काॕन्क्युजन सबस्टिट्यूशनएवढी जडेजाची अवस्था खराब होती तर त्याला शेवटचे पाच चेंडू खेळवण्याचा धोका भारतीय संघव्यवस्थापनाने का पत्करला? त्या काळात काही बरे वाईट झाले असते तर…? सामन्यानंतरच्या पुरस्कार समारंभात कर्णधार विराट कोहली म्हणालासुध्दा की जद्दूला अजुनही अंधारल्यासारखे, गरगरल्यासारखे वाटतेय. मग हा धोका का पत्करला?

जर जडेजा हे पाच चेंडू खेळु शकत होता तर काॕन्क्युजन सबस्टिट्यूटची गरज होती का? बहुधा हाच मुद्दा आॕस्ट्रेलियन संघप्रशिक्षक जस्टीन लँजर हे रेफरी डेव्हिड बून यांच्याकडे मांडत असावेत किंवा ही ‘लाईक टु लाईक’ रिप्लेसमेंट नसल्याचेही त्यांचे म्हणणे असावे…पण ते नेमके काय मांडत होते हे समोर आलेले नाही पण आॕस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने मात्र म्हटलेय की, डॉक्टर जर म्हणत असतील की जडेजाला काॕन्क्युजन होते, ते खेळायच्या स्थितीत नव्हता तर ते मान्य करायलाच पाहिजे.

काही असो पण रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि त्यांच्या काॕन्क्युजन सबस्टिट्यूशन काही प्रश्न उपस्थित केले आहेत हे मात्र नक्की!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER