उडदामाजी गोरेकाळे, कोरोनातही काय वेगळे…

Pune - Maharashtra today

Shailendra Paranjapeपुणं हे सामाजिक संस्थांचं मोहोळ आहे आणि पुण्यात समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था कार्यरत आहेत. पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून केलं जाणारं सामाजिक कामही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कोरोना काळातही या सर्व सामाजिक संस्था, गणेश मंडळे आपापल्या परीने योगदान देत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या आणि लॉकडाऊनच्या वेळी या सर्वांनी अन्नवाटप, शिधावाटप यापासून सर्व प्रकारचं सामाजिक काम करून पुण्याच्या लौकिकात भर टाकली होती. कोरोनासारख्या रोगावरचे उपाय असोत की अंतराळ संशोधन पुण्यानं कायम देशाला दिशा दिली आहे. कोरोनासारख्या आपत्तीच्या काळातही पुण्यामध्ये सामाजिक काम होत असतानाच पुण्यातले काही तज्ज्ञ राष्ट्रीय पातळीवर योगदान देत आहेत.

त्याबरोबरच काही लोक मरणातही संधी शोधत आपले खिसे भरायचे काम करत पुण्याला बदलौकिक आणत आहेत. लग्न समारंभ असो की अंत्यविधी अट्टल चोराला गर्दी दिसली की त्याचे हात शिवशिवायला लागतात तसं कोरोना आपत्तीच्या काळात लॉकडाऊनसारखे निर्बंध असल्याने विविध प्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. एकीकडे पुण्याचे नाव आपापल्या परीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणाऱ्यांचीही मान खाली जाईल, अशा प्रकारच्या घटना गेल्या दोन-तीन दिवसांत पुण्यात घडल्यात. न्यायालयाच्या आदेशानंतर देहविक्रय करणाऱ्या महिलांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे १५ हजार रुपये सरकारने बँक खात्यांमध्ये जमा केले.

मुळात रेड लाईट एरियासह देहविक्रय करणाऱ्या महिलांची अद्ययावत यादी नसल्याने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे काम करावे लागले आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांबरोबरच गरीब वस्त्यांमधल्या काही अशिक्षित महिलांचे अंगठे घेऊन त्यांचे नाव परस्पर या यादीत घालण्याचा आणि त्यातून या महिलांकडून साडेसात हजार रुपये उकळण्याचा प्रकार काहींनी केलाय. गोरगरीब महिलांनी आम्हाला हे फुकटचे पैसे नकोत आणि आम्हाला अंधारात ठेवून फसवून आमची नोंद देहविक्रय करणाऱ्या म्हणून केल्याची तक्रार करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केलीत.कडक निर्बंधांनंतर जिल्हा प्रवासाला बंदी झालीय आणि अत्यावश्यक कारणांसाठी असा प्रवास करणाऱ्यांना पोलीस वाहनाचा पास देत आहेत. पुण्यात एका २९ वर्षीय व्यक्तीने लॅपटॉपवरून बनावट पास तयार करून दिले आणि काही लोकांची फसवणूक केली. अर्थात, पोलीस खात्यातल्या सजग अधिकाऱ्यांनी त्याला हुशारीने पकडले आहे.

एकीकडे कोरोनाकाळात घरात बसल्याबसल्या हा बनावट पासचा धंदा करणाऱ्या महाभागाला पोलिसांनी पकडलेय तर दुसरीकडे गावाबाहेर कुडजे या खडकवासला परिसरातल्या छोट्या गावात फार्म हाऊसवर मुंबईहून डान्सर मुली आणून दारू पार्टी करणाऱ्यांनाही पोलिसांनी पकडलंय. विशेष म्हणजे या लोकांमध्ये पालिकेतले ठेकेदार आणि एका कनिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे. लोकांनी घराबाहेर कारणाविना पडू नये, असं सर्वसामान्यांना सांगितलं जात असताना हे लोक दारूची पार्टी करतात, कर्णकर्कश संगीतावर नाचगाणी करतात आणि त्यासाठी मुंबईतून मुली येऊ शकतात, हे सगळं कायदा सर्वांना समान नाही, याचीच साक्ष पटवणारं आहे. अन्यथा, या मुली पुण्यापर्यंत पोहचूच शकल्या नसत्या. एकीकडे पुण्याचा नावलौकिक सातासमुद्रापार नेणाऱ्यांबरोबरच मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे, नाचगाणी करणारे पुण्याची कोरोनामुळे झालेली बदनामी आणखी वाढवीत आहेत.

त्यांना कडक शिक्षा व्हावी, इतकीच अपेक्षा आपण करू शकतो. जाता जाता आयुष मंत्रालयानं आयुष-६४ हे औषध कोरोनाच्या प्राथमिक पातळीवरच्या म्हणजे सौम्य लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांना उपयुक्त ठरू शकेल, असं जाहीर केलंय. आयुष-६४ हे वनौषधींवर आधारित औषध असून त्याच्या कोरोनासंदर्भातल्या संशोधनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या विद्या गिरीश टिल्लू यांचाही सहभाग आहे. आयुर्वेदिक आणि अलोपॅथीतल्या संशोधकांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे आणि विविध पातळ्यांवरच्या ४५ हजार व्यक्तींच्या संदर्भातली माहितीच्या संस्करणातून आणि तीन शहरांतल्या रुग्णांवर उपचारातून आयुष-६४ प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आले आहे.

रुग्णांना नेहमीच्या उपचारांबरोबर आयुष-६४ दिल्यास त्याचे परिणाम रुग्ण तुलनेने लवकर बरे होऊ शकतात आणि त्यामुळे रुग्णालयात खाटांची भासत असलेली कमीही भरून निघेल, असं मत राष्ट्रीय पातळीवरचे संशोधक डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केलंय. कोरोनाकाळातही गुन्हेगारी वृत्ती वर उफाळून येत असताना विद्या टिल्लू यांच्यासारखे संशोधक पुण्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी योगदान देत आहेत. त्यांचं अभिनंदनच करायला हवं. कोरोनाकाळात सगळीकडे नकारात्मकता पसरत असताना आयुष-६४ औषधासारखी सकारात्मक गोष्ट कोरोना रुग्णांनाही बरे करेल आणि कोरोना न झालेल्यांना जगण्याचं बळ देईल.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

शैलेन्द्र परांजपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button