शरद पवार काय बोलणार?

Sharad Pawar Bhima Koregaon Editorial

badgeदोन वर्षांपूर्वी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या चौकशी आयोगाने राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावणे पाठवले आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे युती सरकारच्या राजवटीत झालेल्या ह्या दंगलीनंतर शरद पवारांनी काही वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांना साक्षीला बोलवावे अशी विनंती विवेक विचार मंचाने आयोगाला केली होती. त्यानुसार पवारांना येत्या ४ एप्रिलला आयोगापुढे जावे लागणार आहे. निवडणुकीपूर्वी ईडीने शिखर बँक गडबड प्रकरणी पवारांना नोटीस पाठवली होती. त्यावरून मोठा हंगामा पवारांनी उभा केला होता. आताचा मामला त्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे पवार साक्षीला जातील. त्याचे टेन्शन भाजपला अधिक आले आहे. बदललेल्या राजकीय हवेत पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे.

एल्गार परिषद आणि ही दंगल ह्या भोवती राज्याचे राजकारण अजूनही फिरताना दिसते. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात एल्गार परिषद झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी ही दंगल झाली. पुण्याजवळील गावात झालेल्या ह्या दंगलीने तापलेले राजकारण अजूनही उकळ्या मारत आहे. देवेंद्र सरकारने ह्या दंगलीचा तपास पुणे पोलिसांकडे सोपवला होता. सत्तेचे समीकरण बदलताच उद्धव सरकारने वेगळ्या हालचाली सुरु केल्या. त्याचा सुगावा लागताच मोदी सरकारने हा तपास एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास पथकाकडे सोपवला. महाआघाडी सरकारने याला विरोध करताना आपल्या पोलिसांकडूनही समांतर चौकशीची भाषा केली. सरकार बदलले असले तरी पटेल चौकशी आयोगाचे कामकाज सुरू आहे. ‘दंगलीआधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी तिथले वातावरण बिघडवले होते’ असा सनसनाटी आरोप त्यावेळी पवारांनी केला होता. पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी शंका व्यक्त केली होती. पवारांकडे जास्तीची माहिती असेल आणि म्हणून त्यांना साक्षीला बोलवावे अशी मागणी विवेक मंचाने केली होती. आयोगाने ती मान्य केलेली दिसते. पवारांच्या साक्षीने देवेंद्र सरकारच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ह्या साक्षीला राजकीय महत्व आले आहे.

भीमा-कोरेगावच्या दंगलीत सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. एक इसमाचा मृत्यूही झाला होता. हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ६४९ गुन्हे दाखल केले होते. ते मागे घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीने लावून धरली होती. उद्धव सरकारने त्यातील ३४८ केसेस मागेही घेतल्या आहेत. न्या. पटेलांची चौकशी महत्वाच्या टप्प्यावर आली असल्याने तिच्यात काय समोर येते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


Web Title : Sharad Pawar Latest News on Maharashtra

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)