आता संजय राठोड यांचे काय होणार?

Sanjay Rathore

राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore)हे टिकटॉक स्टार तरुणी पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिच्या आत्महत्येप्रकरणी थेट आरोप झाल्यानंतर चांगलेच अडचणीत आले असून ते राजीनामा देणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी त्यांचा बचाव करण्याची भूमिका शिवसेनेकडून घेतली जात असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी केलेल्या विधानांवरून स्पष्ट झाले.

आरोप करुन प्रतिमा मलिन करणे चांगले नाही, माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ अशा धाटणीची उत्तरे खा.संजय राऊत, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे,उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना, पूजाच्या आत्महत्येची तसेच संजय राठोड यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले. मात्र, त्याचवेळी आरोप करून कोणाला आयुष्यातून संपविण्याचा प्रयत्न होत असेल तर ते योग्य नाही असेही ते म्हणाले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला तेव्हाही महाविकास आघाडीतील नेत्यांनी, राजकीय जीवन घडविताना खूप कष्ट लागतात आणि कोणी काही आरोप केले म्हणून संबंधिताचा राजीनामा घेणे योग्य नाही’ अशी भूमिका घेतली होती. नंतर धनंजय यांचा बचाव करण्यात आला, त्यांने मंत्रिपद शाबूत राहिले होते. आता त्याच न्यायाने संजय राठोड यांना अभय दिले जाणार अशीदेखील चर्चा आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. त्या अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरण भाजपकडून चांगलेच लावून धरले जाईल असे दिसते.बंजारा समाजातील एक गुणी तरुणी आत्महत्या करते आणि सरकार संबंधितांवर कारवाई करणार नसेल तर आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नसेल असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘महाराष्ट्र टुडे’ला सांगितले. दरम्यान, पूजाच्या आत्महत्येशी संबंधित १२ आॅडिओ क्लिप सध्या व्हायरल झाल्या असून त्यात अतिशय धक्कादायक बाबी आहेत. पूजा दोन महिन्यांची गर्भवती होती असे त्यातील संवादांवरुन दिसते. एक कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्यादरम्यानचा हा संवाद असल्याचे म्हटले जाते. ‘प्रकरण मिटव रे बाबा, नाहीतर माझं राजकीय आयुष्य संपेल, मला आत्महत्याच करावी लागेल, मला सन्यास घ्यावा लागेल. काहीही कर, प्रकरण मिटव’ असे एक जण दुसºयाला म्हणतानाचेही संवाद त्यात आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिचा मोबाईल पोलिसांच्या हाती पडता कामा नये असे ते कथित मंत्री कार्यकर्त्याला बजावत आहेत, मोबाईल ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये खिडकीतून जा पण जा असे सांगत असल्याचे आॅडिओ क्लिपमध्ये आहे.

आरोप सुरू झाल्यापासून संजय राठोड हे बेपत्ता आहेत. मुंबईतील सरकारी बंगला, खासगी फ्लॅट, यवतमाळमधील बंगला इथे कुठेही ते नाहीत. त्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यांचे पीए, पीएस, मंत्री कार्यालयातील लोकही धास्तावले आहेत. लोकांच्या कॉलना उत्तरे देताना त्यांची पुरेवाट होत आहे. पूजा ही पाचएक वर्षांपासून राठोड यांच्या बंगल्यावर दिसायची. राठोड हे आधीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते तेव्हाही तिचा राठोड यांच्या बंगल्यावर राबता होता असे म्हणतात.
महिला आयोगाकडून दखल

पूजा चव्हाणच्या आत्महत्येची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपशील तसेच होत असलेल्या विविध आरोपांची विस्तृत माहिती सादर करा असे आदेश आयोगाने राज्याच्या गृह विभागाला दिले आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर या आत्महत्येप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची मागणी आधीच केली आहे. पूजाच्या बहिणीने टाकलेल्या फेसबूक पोस्टमध्ये पूजा नक्कीच तणावाखाली होती, नाहीतर ती आत्महत्या करणाºयांपैकी नव्हती असे म्हटल्याने आता या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER