नाना पटोले काय होणार? उपमुख्यमंत्री, मंत्री की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

Nana patole

विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी गुरुवारी राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण होणार? नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार का अशा अनेकानेक चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याचा प्रश्नच नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले असले तरी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यापैकी एकाला विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाईल अशी चर्चा आहे. पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद द्यावे, अमित देशमुख यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करावे आणि नाना पटोले यांना आदिवासी विकास खात्याचे मंत्रिपद द्यावे या पर्यायावरही विचार होऊ शकतो. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह मान्य झाला नाही तर पटोले यांना महत्त्वाचे मंत्रिपद दिले जावू शकते.

नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार अशी अटकळ होती. मात्र, ते काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा प्रवास करून आलेले आहेत. त्याऐवजी आठवेळा काँग्रेसचे आमदार असलेले के.सी.पाडवी यांना प्रदेशाध्यक्ष करावे वा विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना संधी द्यावी आणि पटोले यांचे मंत्रिपदावर समाधान करावे असाही एक फॉर्म्युला समोर आला आहे.

पटोले हे आक्रमक नेते आहेत. ते ओबीसी समाजाचे आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून ओबीसी चेहरा द्यायचे ठरले तर त्यांना संधी दिली जावू शकते. मात्र, काँग्रेसच्या विदर्भातील दोन बड्या मंत्र्यांचा प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोले यांच्या नावाला विरोध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच एकीकडे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊनदेखील त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त होवू शकलेली नाही.

दिल्लीत त्यासाठी जोरदार लॉबिंग अनेकजण करीत आहेत. पटोले हे आक्रमक नेते आहेत पण त्यांच्या आक्रमकतेचा फटका यापूर्वी पक्षाला बसलेला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेतच शेतकºयांच्या प्रश्नांवर आपले सरकार अन्याय करीत असल्याचा आरोप केला व आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २००९ ची लोकसभा निवडणूक ते भंडारा-गोंदिया मतदारसंघात अपक्ष लढले पण पराभूत झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले होते. २०१४ मध्ये ते भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले. तेथेही नरेंद्र मोदी सरकार शेतकºयांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप थेट मोदींसमोरच करून ते नंतर पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचेही नेते आहेत. त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार हे निश्चित मानले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER