नाटकधंद्याचं कसं होणार?

Marathi Drama -Corona

चांगल्या काळात सगळेच आपल्यासोबत असतात; पण काळाने कूस बदलली आणि जर जगण्यावर काळे ढग जमा झाले, की त्यानंतर कळतं आपल्या भवताली असणाऱ्यांत खरं कोण आहे ते. कोरोना (Corona) काळ हा खरं तर त्यासाठी अत्यंत मोलाचा ठरला. म्हणूनच या काळात अनेकांच्या घरात नवी नाती जन्माला आली. अनेकांना मैत्रीचं खरं रूप कळलं. थोडक्यात अपेक्षाभंगाचं दु:ख आणि चकित करणारं सुख पदरी पडलं नाही असा माणूस मिळणं अवघड. पण हे माणसाच्या पातळीवर होतं तोवर ठीक होतं. पण एकीकडे इंडस्ट्रीत (Industry) तोट्यात असताना, इंडस्ट्रीत गटांगळ्या खात असताना त्याचा लगाम हाती असलेल्या संघटनांमध्येच जर वादावादी आणि मतभेद होत असतील तर त्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तळातल्या वर्गाने काय करावं हा प्रश्न निर्माण होतो.

मराठी नाट्यसृष्टी (Marathi drama) त्याला अपवाद नाही. सध्या नाट्यसृष्टीमध्ये दोन वाद जोरदार चालू झाले आहेत. त्या वादांना मतभेद किंवा मत-मतांतरं असं गोंडस नाव देऊन बौद्धिक बनावटगिरी दाखवली जरी जात असली तर इंडस्ट्री संकटात असताना संघटनेत बेबनाव होऊन संघटना फुटणं हे फार गौरवास्पद नाही. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो नाट्यनिर्माता संघाचा आणि दुसरा उल्लेख करायला हवा तो नाट्यपरिषदेच्या नाराज नियामक मंडळ सदस्यांचा. निर्मात्यांना होणाऱ्या मदतीवरून निर्मात्यांमध्ये दुफळी माजली. निर्माता संघात असलेल्या ठेवीचं वाटप गेल्या तीन वर्षांत नाटक न केलेल्या निर्मात्यांना करण्यावरून निर्माता संघाचे पदाधिकारी आणि इतर सदस्य यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर अजित भुरे, सुनील बर्वे, प्रशांत दामले, विजय केंकरे, राकेश सारंग आदींनी राजीनामे दिले. त्यानंतर त्यांनी नव्या संघटनेची घोषणा केली.

जागतिक नाट्यधर्मी निर्माता संघ असं त्याचं नाव. हे प्रकरण ताजं असतानाच, नाट्यपरिषदेतही नाराजीनामा चालू झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी हे नियामक मंडळाला विश्वासात न घेता कामकाज करत असल्याबद्दल नियामक मंडळाने वारंवार नाराजी नोंदवली आहे; पण त्याचा काहीच फरक पडत नसल्याने नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीलाच या मंडळींनी ई-मेलद्वारे काही प्रश्न विचारले आहेत. यात स्पष्ट दिसतं, की परिषदेत चालणाऱ्या कारभारावरून नियामक मंडळ समाधानी नाही. व्यावसायिक निर्माता संघाची धुरा आता अध्यक्ष म्हणून संतोष काणेकर (Santosh Kanekar) यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दुसऱ्या निर्माता संघाचे अध्यक्ष आहेत, अमेय खोपकर (Ameya Khopkar). खरं तर अमेय खोपकरांच्या गोटात असलेल्या निर्मात्यांकडे सध्या चालू असलेली जास्त नाटकं आहेत; पण आता पडलेल्या फुटीमुळे एका प्रवाहाचे दोन प्रवाह तयार झाले आहेत. दुसरीकडे नाट्यपरिषदेच्या कारभाराबाबत नियामक मंडळाच्या सदस्यांनीच नाराजी नोंदवायला सुरुवात केली आहे.

खरं तर कोणत्याही ट्रस्टमध्ये नियामक मंडळ सर्वोच्च असतं; पण याच मंडळाने नाराजी नोंदवल्यामुळे नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी महिनाभरापूर्वी नियामकच्या काही मंडळींनी विश्वस्त मंडळाला ई-मेल पाठवून नाराजी नोदंवली होती. पण आता या संख्येत वाढ झाली आहे. नाराज १४ ची संख्या आता २२ झाली आहे. त्यांनी कार्यकारिणीलाच पत्र लिहून ऑगस्ट २०१८ ते २०२० अशा काळातला लेखाजोखा मागितला आहे; शिवाय कोरोना काळातल्या मदतीवर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कोरोना काळात संपूर्ण नाट्यसृष्टी अडचणीत आहे. एकीकडे नाटकं कधी सुरू होणार याचा पत्ता नाही.

अशा वेळी नाट्यनिर्मात्यांत पडलेली फूट आणि ती फूट होऊ न देणे यावर लक्ष देण्यापेक्षा नाट्यपरिषद अंतर्गत कारभारामुळे चर्चेत असणं हे नाट्यसृष्टीसाठी फार बरं लक्षण नाही. अर्थात याची कुणालाच काही पडलेली दिसत नाही; कारण, हे वाद मिटवण्याचा प्रयत्न कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनानंतर तयार होणारी नाट्यसृष्टी नेमकी कशी असेल आणि किती तुकड्यांत विभागली गेली असेल हे सांगणं आता अवघड बनलं आहे.

ही बातमी पण वाचा : सोनाली रंगली प्रीवेडिंग फोटोशूटमध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER