विधान परिषद निवडणुकीत काय होणार? : मंगळवारी मतदान

Vidhan Parishad

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला याचा फैसला या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. निकाल ३ डिसेंबरला जाहीर होईल.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन भिन्न विचारांचे मित्रपक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असून त्यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विरुद्ध भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात रंगतदार लढत होत आहे. त्यांच्याशिवाय, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, अपक्ष असे एकूण ३५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची एकूण संख्या ३ लाख ७३१६६ आहे. नागपूर पदवीधर हा भाजपचा अभेद्य किल्ला आहे. एकदाही भाजपचा पराभव त्या ठिकाणी झालेला नाही, उलट मताधिक्याची कमान चढती राहिली आहे. यावेळी नागपूरचे महापौर संदीप जोशी विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी असा थेट सामना आहे.

२ लाख ६४५४ मतदार आहेत आणि उमेदवारांची एकूण संख्या १९ आहे. वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, विदर्भवाद्यांचे उमेदवार नितीन रोंघे, अपक्ष प्रशांत डेकाटे, अतुलकुमार खोब्रागडे यांनीही आव्हान उभे केले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे ( शिवसेना), नितीन धांडे (भाजप), प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ-अपक्ष), दिलिप निंभोरकर (शिक्षक भारती-अपक्ष), शेखर भोयर (शिक्षक महासंघ-अपक्ष),किरण सरनाईक हे प्रमुख उमेदवार आहेत. ३५ हजार ६२२ मतदार असून २७ उमेदवार भाग्य अजमावित आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघत ६२ उमेदवार रिंगणात असून ४ लाख २६२५७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, माजी आमदार शरद पाटील आणि मराठा समाजाचे नेते डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा.जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. ७२ हजार ५४५ मतदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER