
2022 पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळविण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक सभेत मान्यता मिळाल्यानंतर आता हे दोन नवे संघ कोणते राहतील याची चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात अहमदाबादचा एक संघ असेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे पण दुसरा संघ कोणता असेल याच्याबद्दल विविध तर्क लावण्यात येत आहेत.
एकाच राज्यातील दोन फ्रँचाईजी असणार नाहीत हे धोरण ठरल्याने पुणे आता स्पर्धेतून बाद झाले आहे. महाराष्ट्रातून मुंबई इंडियन्सचा संघ आधीच आहे. शिवाय तामिळनाडू (चेन्नई),आंध्र (हैदराबाद), राजस्थान, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल (कोलकाता), कर्नाटक (बंगलोर) यांचेसुध्दा दुसरे संघ असणार नाहीत.
यामुळे अहमदाबाद पाठोपाठ लखनऊचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील इंदूर, केरळातून कोची, झारखंडातून रांची, विशाखापट्टणम, यांची चर्चा आहे.
सद्यस्थितीत दक्षिणेकडील तीन आणि उत्तरेकडील तीन, पश्चिम आणि पूर्वेकडचे प्रत्येकी एक संघ आहे. आणि मध्य भारतातुन एकही संघ नाही. म्हणून पश्चिमेकडून अहमदाबाद तर मध्य भारतातून इंदूर आणि पूर्वेकडील समजले तर लखनऊचा दावा मजबूत होतो. यापैकी कोणते व किती संघ खेळतील हे आयपीएल संचालन परिषद निश्चित करणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला